संतप्त महिलांनी पेटविली दुकानातील दारू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

गोंदिया ः गावात दारूबंदी असूनही काही महिन्यांपासून बंद असलेले देशी दारूचे दुकान शासनाच्या प्राप्त निर्णयामुळे पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र, महिलांनी दारू दुकान पुन्हा बंद करावे, म्हणून दुकान मालकाला सांगितले होते. मात्र, दुकानदाराने कानाडोळा केल्याने महिलांनी दुकानातील दारू बाहेर काढून पेटवून दिली. या वेळी महिला चांगल्याच संतप्त झाल्या होत्या. हा प्रकार शनिवारी (ता. 7) खमारी येथे घडला.

गावात देशी दारूचे दुकान होते. शिवाय अनेकांचा अवैध दारू विक्री करण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे गावातील पुरूष व्यसनाधिन झाले होते. त्यामुळे खमारी येथील ग्रामपंचायतीने 25 एप्रिल 2017 संपूर्ण गाव दारूबंदी गाव म्हणून ग्रामसभेत ठराव घेतला. तसे घोषितदेखील केले होते. दरम्यान, शासनाच्या महामार्गालगतच्या दारू दुकाने बंद करण्याच्या निर्णयामुळे हे दारू दुकान गेल्या कित्येक दिवसांपासून बंद होते. काही दिवसांआधी शासनाने आपला निर्णय मागे घेत महामार्गालगतची दारू दुकाने तसेच बार सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
खमारी येथील देशी दारू दुकान चार दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले होते. दुकान सुरू होताच दारूबंदी समितीच्या अध्यक्ष आशा शिवणकर, कुसूम वलथरे, संतकला बोरकर, माजी सरपंच विमल तावाडे, वनमाला उके, भाग्यश्री लांडेकर, लक्ष्मी भालाधरे, प्रभा मेंढे आदींसह शेकडो महिलांनी एकत्र येत सदर दारू दुकान बंद करावे, असे दुकान मालकाला सुचविले होते. शनिवारी दुकान सुरू होताच महिलांनी एकत्र येत दुकान मालकाला दुकान बंद करण्याकरिता एक तासाचा कालावधी दिला. मात्र, दुकानदाराने दुकान बंद न केल्यामुळे महिलांनी दुकानातील दारूच्या पेट्या दुकानाबाहेर काढून पेटवून दिल्या. मालकाने दुकान बंद करून पोबारा केला. काही वेळानंतर पोलिस घटनास्थळावर पोचले. महिलांचा आक्रोश व गावात तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती. सायंकाळी उशीरा गोंदिया ग्रामीण पोलिसांनी महिलांवर गुन्हा दाखल केला.

Web Title: Villege women got voilent