चार वर्षांत राज्य शिक्षणात तिसऱ्या स्थानी : तावडे

File photo
File photo

वर्धा : कोणतेही मूल अनुत्तीर्ण होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखायला आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्या सोयीसाठी त्यांच्या कपाळावर नापासचा शिक्का मारतो. विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षित करणे म्हणजे शिक्षण असे मानून राज्य शासन शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवीत आहे. त्याचा परिणाम म्हणजे चार वर्षांत राज्य शिक्षणाच्या बाबतीत देशात 16 व्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर आले. यावर्षी ते प्रथम क्रमांकावर राहील. विद्यार्थी घडविणे हाच आमचा मूळ उद्देश असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
सेवाग्राम येथील चरखा घर येथे आयोजित "शिक्षणाची वारी' या उपक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. 10 जिल्हे या वारीला जोडले आहेत. आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, विभागीय आयुक्त संजीव कुमार, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, नगराध्यक्ष अतुल तराळे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, पंचायत समितीच्या सभापती महानंदा ताकसांडे, शिक्षण विभागाचे संचालक सुनील मगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी "अनटोल्ड स्टोरी' या दिव्यांगांनी त्यांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केलेल्या यशोगाथेचे पुस्तक प्रकाशन करण्यात आले. दीप्ती बेले या कान्हापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीचा दीपकाव्य कवितासंग्रह, शुभांगी वासनिक यांच्या "रत्नाची खाण' आणि "सार्थक जीवनासाठी संस्कारपर्व' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
शिक्षणाची वारीत विविध शाळांचे 55 दालने लावण्यात आली आहेत. सहा जानेवारीपर्यंत चालणाऱ्या वारीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक सुनील मगर यांनी प्रास्ताविकातून केले. संचालन ज्योती भगत यांनी केले. शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com