esakal | उपराजधानीला "व्हायरल'चा ताप
sakal

बोलून बातमी शोधा

उपराजधानीला "व्हायरल'चा ताप

उपराजधानीला "व्हायरल'चा ताप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : शहरात मुसळधार पावसामुळे वातावरणात अचानक गारवा वाढतो. पावसाने दडी मारल्यानंतर उकाड्यामुळे साथीच्या आजारात वाढ होत आहे. दुपारी उन्हाचा तडाखा आणि अचानक येणारा पाऊस यामुळे नागपूरकर हैराण झाले असून सर्दी, खोकला आणि श्‍वसनविकारांचा त्रास जाणवू लागला आहे. याशिवाय वाढत्या प्रदूषणामुळे वातावरणात विषाणूंचा संसर्ग वाढला आहे. यामुळे उपराजधानीला "व्हायरल' तापाचीही लागण झाल्याचे दिसून येत आहे.
वातावरणातील बदलांमुळे घरोघरी स्वाइन फ्लूसह व्हायरल ताप प्रत्येकाच्या साथीला दिसतो. याशिवाय डेंगी, मलेरिया आणि कावीळ या साथ आजारांनी डोके वर काढले आहे. नागपूर शहरात आतापर्यंत 255 स्वाइन फ्लू बाधितांची नोंद झाली आहे. डेंगीचा डास डंख मारतोय. अवघ्या 30 दिवसात ऑगस्ट महिन्यात 29 डेंगीग्रस्त आढळले आहेत. शहरातील सर्वसामान्यांना साथींच्या आजाराच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे काम महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आहे. परंतु, महापालिकेचेच आरोग्य बिघडले आहे. ताप, डेंगी असो वा मलेरिया, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे विचारणा केली की, मेयो, मेडिकल आणि खासगीकडे बोट दाखवण्याचा प्रकार सुरू आहे.
उपराजधानीत गेल्या सहा महिन्यांत सहाशेवर गॅस्ट्रोग्रस्तांची नोंद झाली आहे. तर मेडिकल, मेयोतही गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात मागील महिनाभरापासून घरोघरी तापाचा रुग्ण असताना महापालिकेच्या नोंदीत मात्र केवळ मलेरियाग्रस्तांची नोंद दिसत नाही. याशिवाय पावसाळ्यातील काविळीचा धोकाही उपराजधानीत कायम आहे. शहराच्या विविध भागांतील खासगी डॉक्‍टरांशी संवाद साधला असता, प्रत्येक दवाखान्यात दर दिवसाला 80 ते 120 रुग्ण येत असल्याची माहिती मिळाली. यात ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, हिवतापाच्या रुग्णांचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती डॉ. एम. एम. बोरकर यांनी दिली.

 
loading image
go to top