अतिक्रमण कायम करण्यासाठी वीरूगिरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

दिग्रस येथील १०० फूट टॉवरवर चढून तरुणाने केली मागणी
दिग्रस (जि. यवतमाळ) - तालुक्‍यातील इसापूरजवळील सर्वे नं. १४० वरील शासनाने काढलेले अतिक्रमण आधी कायम करा, अन्यथा जीव गेला तरी चालेल, अशी मागणी करीत श्‍याम गायकवाडने गुरुवारी (ता. २) दुपारी एकला येथील तहसील कार्यालयातील पवनचक्कीच्या १०० फूट उंच टॉवरवर चढून वीरूगिरी केली.

दिग्रस येथील १०० फूट टॉवरवर चढून तरुणाने केली मागणी
दिग्रस (जि. यवतमाळ) - तालुक्‍यातील इसापूरजवळील सर्वे नं. १४० वरील शासनाने काढलेले अतिक्रमण आधी कायम करा, अन्यथा जीव गेला तरी चालेल, अशी मागणी करीत श्‍याम गायकवाडने गुरुवारी (ता. २) दुपारी एकला येथील तहसील कार्यालयातील पवनचक्कीच्या १०० फूट उंच टॉवरवर चढून वीरूगिरी केली.

आतापर्यंत ३०, ४८ व ७२ तास असे उच्चांक गाठत टॉवरवर किंवा झाडावर चढून वीरूगिरी आंदोलन करून नेहमी शासनास वेठीस धरणारा श्‍याम गायकवाड गुरुवारी पुन्हा टॉवरवर चढल्याने जिल्हा परिषद व पचायत समितीच्या निवडणुकीतील छाननीच्या दिवशी तहसील व पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली. मागील सात-आठ वर्षांपासून शासनाची सर्वे नं. १४० जागा पडीत आहे. या जागेवर भूमिहिनांना झोपड्या बांधून राहू द्या, अशी लेखी मागणी आदिवासी विकासमंत्री मुंबई व आयुक्त अमरावती यांच्याकडे केली होती. 

मागील सहा महिन्यांपासून शासनाच्या ई-क्‍लास जमिनीवर ६० ते ७० कुटुंब झोपड्या बांधून राहत होते. मात्र, आज गुरुवारी दुपारी बाराला महसूल व पोलिस प्रशासनाने अतिक्रमण हटविले. हे अतिक्रमण कोणाच्या आदेशाने हटविले, हे सांगायला प्रशासन तयार नाही. त्यामुळे काढलेले अतिक्रमण त्वरित कायम करावे, या मागणीसाठी श्‍याम गायकवाड गुरुवारी पुन्हा टॉवरवर चढला. मागणी पूर्ण होईपर्यंत टॉवरवरच राहण्याचा निर्णय त्याने घेतला. जीव गेला तरी चालेल, अशी ठाम भूमिका आंदोलक श्‍याम गायकवाड याने घेतली आहे.

मागणी कायद्याला धरून नाही - तहसीलदार 
शासनाच्या ई-क्‍लास जमिनीवर कोणालाही अतिक्रमण करता येत नाही, असा न्यायालयाचा आदेश आहे. त्यामुळे शासकीय कार्यवाहीचा एक भाग म्हणून शासनाच्या ई-क्‍लास जागेवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही प्रशासनाने केली आहे. श्‍याम गायकवाड यांची मागणी कायद्याला धरून नाही, असे तहसीलदार किशोर बागडे यांनी सांगितले. विशेष बाब म्हणजे श्‍याम गायकवाड हे पंचायत समितीच्या मांडवा गणातून अपक्ष उमेदवारही आहे. त्यामुळे त्याचे आंदोलन नियमबाह्य असल्याचेही तहसीलदार बागडे यांनी पुढे सांगितले.

Web Title: Virugiri to continue infringement