विष्णू मनोहर यांचे 53 तास विश्‍वविक्रमी कुकिंग मॅराथॉन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

या विक्रमातून अन्नाची नासाडी थांबवा, शाकाहाराचे महत्त्व वाढवा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्या, हे तीन संदेश मला द्यायचे होते. माझ्या नावावर विक्रम असला तरी तो विदर्भातील कष्टकरी शेतकऱ्यांना मी समर्पित करीत आहे. 
- विष्णू मनोहर, सुप्रसिद्ध शेफ 

नागपूर - महाराष्ट्रातील सुगरण गृहिणींचे लाडके नागपुरातील सर्वाधिक "हॅपनिंग' व्यक्तिमत्त्व सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सलग 53 तास कुकिंगचा विश्‍वविक्रम रचला. अमेरिकेचे बेंजामीन पेरी यांचा 40 तासांचा विश्‍वविक्रम मोडीत काढून विष्णू यांनी आज (रविवार) एक नवा विश्‍वविक्रमही प्रस्थापित केला. जगण्याचा संघर्ष करणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांना त्यांनी आपला विश्‍वविक्रम समर्पित केला आहे.

गिनेस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लवकरच त्यांचे नाव नोंदविण्यात येईल. जवळपास अडीच दिवस विष्णू यांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांनीही एक अनोखा विक्रमच रचला. 

नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या सभागृहात शुक्रवारी (ता. 21) सकाळी 8 वाजता 52 तासांचे लक्ष्य ठेवून विष्णू मनोहर यांनी हा प्रवास सुरू केला. एक हजारांपेक्षा अधिक पदार्थ तयार करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. मात्र, तासांच्या आधारावर विश्‍वविक्रम रचायचा असल्याने त्यावरच लक्ष केंद्रित केले आणि साडेसातशे पदार्थ तयार केले. विशेष म्हणजे सर्व पदार्थ शाकाहारी होते. आज (रविवार) सायंकाळी 5.30 वाजता त्यांनी कुकिंग मॅराथॉनला पूर्णविराम दिला आणि 53 तासांच्या विक्रमावर मोहर उमटवली. साडेपाचच्या ठोक्‍याला सभागृहात संदल वाजू लागली आणि "विष्णू', "विष्णू'चा गरज होऊ लागला. चाहत्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी विष्णू यांचे आई-वडीलदेखील उपस्थित होते. पत्नी अपर्णा मनोहर यांनी पुष्पहार घालून विष्णूचे अभिनंदन केले. त्याचवेळी एका चाहत्याने शेफच्या युनिफॉर्मच्या आकाराचा केक आणून जल्लोषात भर घातली. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सरप्राईज व्हिजीट देऊन विष्णू यांचे अभिनंदन केले. तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभेच्छांचा संदेश घेऊन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली. वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी, विष्णू यांचे गुरू आणि सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत रविवारचा संपूर्ण दिवस सभागृहात उपस्थित होते. 

या विक्रमातून अन्नाची नासाडी थांबवा, शाकाहाराचे महत्त्व वाढवा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्या, हे तीन संदेश मला द्यायचे होते. माझ्या नावावर विक्रम असला तरी तो विदर्भातील कष्टकरी शेतकऱ्यांना मी समर्पित करीत आहे. 
- विष्णू मनोहर, सुप्रसिद्ध शेफ 

असा घडला विक्रम 
या प्रवासाचा एकूण कालावधी साडेसत्तावन्न तास एवढा होता. मात्र, नियमानुसार प्रत्येक तासाला पाच मिनिटे याप्रमाणे 285 मिनिटे (जवळपास साडेचारतास) त्यांना विश्रांती घेता येणार होती. त्यामुळे विश्रांतीचा कालावधी वगळून 53 तासांच्या विश्‍वविक्रमावर विष्णू यांनी मोहर उमटवली. तीन दिवस सभागृहात त्यांच्या चाहत्यांनी हाऊसफुल्ल गर्दी केली होती. सांस्कृतिक, सामाजिक, वैद्यकीय आदी क्षेत्रांमधील 250 कार्यकर्ते शिफ्टनुसार सभागृहात विविध उपक्रमांच्या माध्यमातून विष्णू मनोहर यांचे प्रोत्साहन वाढवत होते. मैत्री परिवाराने या उपक्रमाचे संयोजन केले. 

"मैत्री' असावी तर अशी 
विष्णू मनोहर सातत्याने सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय असतात ते बहुतांशी मैत्री परिवारच्या माध्यमातून. या उपक्रमाचे संयोजनदेखील मैत्री परिवारानेच केले होते. विशेष म्हणजे मैत्री परिवारचे अध्यक्ष संजय भेंडे, चंदू पेंडके, प्रमोद पेंडके, विजय शहाकार यांच्यासोबत विष्णू यांचे खास मित्र सुप्रसिद्ध तबलावादक सचिन ढोमणे, सुप्रसिद्ध गायिका सुरभी ढोमणे, सुप्रसिद्ध निवेदिका रेणुका देशकर आदींनी तीन दिवस स्वतःला झोकून दिले होते. 

विठ्ठल कामतांची उपस्थिती 
प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आणि विष्णू मनोहर यांचे गुरू विठ्ठल कामत यांना उद्या विदेशात जायचे असतानाही त्यांनी ऐनवेळी हजेरी लावून उत्साह वाढवला. विष्णूवर आपले प्रेम आहे आणि त्याच्या जिद्दीचे कौतुक करण्यासाठी नागपुरात आलो आहे, असे विठ्ठल कामत म्हणाले. 

असे होते पदार्थ 
200 प्रकारचे भात 
350 प्रकारचे स्नॅक्‍स 
250 प्रकारचे गोड पदार्थ 
120 प्रकारचे सूप 
175 प्रकारच्या चटण्या व कोशिंबीर 

डॉक्‍टरही ऑन ड्युटी 
डॉ. पिनाक दंदे व डॉ. नीतेश खोंडे यांच्यासह हॉस्पिटलची टीम तीन दिवस विष्णू मनोहर यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी याठिकाणी होती. विष्णू मनोहर यांना झोप येऊ नये म्हणून ज्याप्रमाणे सभागृहात भजन, गाणी, शेरो-शायरी, कविता, गप्पांचे कार्यक्रम सुरू होते, त्याचप्रमाणे डॉक्‍टरांनी देखील त्यासाठी विशेष काळजी घेतली होती. विष्णू यांची प्रकृती ठणठणीत आहे. मात्र, एवढा वेळ सलग काम केल्याने शरीरावर ताण येतोच. त्यामुळे पुढील चोवीस तास कुठलेही काम न करता एकांतात राहून विक्रमाचा आनंद घ्यायला हवा, असे डॉ. पिनाक दंदे यांनी सांगितले. 

"झिंगाट' माहोल 
संदलच्या ठेक्‍यावर नृत्य करण्याचा मोह विष्णू यांच्या चाहत्यांना आवरता आला नाही. आज (रविवार) सकाळपासून प्रत्येक तासाला गाणी आणि नृत्याचा झिंगाट माहोल तयार झाला होता. विक्रमी क्षणाला तर संपूर्ण सभागृह नृत्य करीत होते. 

विक्रमवीरांच्या पंक्तीत 
जगातील सर्वांत ठेंगणी महिला ज्योती आमगे, गायक सुनील वाघमारे, राजेश बुरबुरे, गिटारवादक राकेश वानखेडे, मेंदी कलावंत सुनीता धोटे व केतकी हरदास, सलग 115 तास कुराण वाचणारे मोहम्मद परवेझ आदींच्या यादीत आता सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचेही नाव जोडले गेले आहे. 

सुरवात अन्‌ शेवट गोड 
सत्यनारायणाच्या शिऱ्याने विक्रमी प्रवासाला सुरुवात करणाऱ्या विष्णू मनोहरांनी चना डाळीचा हलवा तयार करून शेवटही गोड केला. यावेळी त्यांनी गजानन महाराज यांचा प्रसाद म्हणून झुनका-भाकर केले. 

साठ परीक्षक 
विष्णू मनोहर यांच्या विक्रमाचे निरीक्षण आणि परीक्षण करण्यासाठी अडीच दिवस तब्बल साठ जणांनी जबाबदारी सांभाळली. दर चार तासांनी परीक्षकांची फळी बदलत होती. विशेष म्हणजे तीन छायाचित्रकार आणि सहा कॅमेरामन यांनीदेखील जवळपास पंधरा तास सलग काम करून मोलाचे योगदान दिले. 

Web Title: Vishnu Manohar's 53 hours world-famous cooking marathon