व्हीएनआयटीचा दीक्षान्त सोहळा उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

नागपूर : देशातील विविध आयआयटीमधून निघणारे विद्यार्थी हे विदेशात नोकरी शोधून तेथेच स्थायिक होतात. याउलट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीतील (एनआयटीएन) विद्यार्थी देशातच विविध क्षेत्रांत काम करून देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण वाटा उचलत असल्याचे प्रतिपादन किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर यांनी केले.

नागपूर : देशातील विविध आयआयटीमधून निघणारे विद्यार्थी हे विदेशात नोकरी शोधून तेथेच स्थायिक होतात. याउलट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीतील (एनआयटीएन) विद्यार्थी देशातच विविध क्षेत्रांत काम करून देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण वाटा उचलत असल्याचे प्रतिपादन किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर यांनी केले.
कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित विश्‍वेश्‍वरय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेच्या (व्हीएनआयटी) सतराव्या दीक्षान्त सोहळ्यात ते बोलत होते. संजय किर्लोस्कर म्हणाले, आजोबा नेहमी सांगत की, देशात राहून आपल्या लोकांसाठी काम करणे आणि काळाच्या पुढे विचार केल्यास प्रगती निश्‍चित होते. आम्ही त्यांची शिकवण सदैव लक्षात ठेवतो. त्यामुळे देशात राहूनच देशाची सेवा करता येऊ शकते. विशेष म्हणजे तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. त्या तुलनेत आपण बदलतो आहे का? याचा विचार अधिक करणे गरजेचे आहे. आज चोवीस तास आपण जगाशी कनेक्‍टेड आहोत. काही वर्षांपूर्वी एखाद्या संस्थेतून अभियंता बाहेर पडल्यावर त्याला नोकरी शोधावी लागत असे. आता ते चित्र बदलले आहे. कंपनी संस्थेत नोकरी देण्यासाठी येते. त्यामुळे करिअरसाठी अनेक संधी आहेत. येत्या काळात देश जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था ठरणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या राशी लड्डा या विद्यार्थिनीचा "सर विश्‍वेश्‍वरय्या' पदकाने सन्मान करण्यात आला. अक्षर राखोलीया या विद्यार्थ्याला नऊ पदके व पुरस्कार आणि इतर विद्यार्थ्यांना 104 पदक आणि पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रास्ताविकातून संचालक डॉ. प्रमोद पडोळे यांनी संस्थेचा कार्याचा आढावा घेतला. विश्राम जामदार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कुलसचिव डॉ. शैलेश साठे यांनी आभार मानले. सोहळ्यात व्हीएनआयटीच्या दीक्षान्त सोहळ्यात 1 हजार 153 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये 100 संशोधक, 268 एमटेक, 53 एमएस्सी. 677, बीटेक तर 55 बीआर्च विद्यार्थ्यांचा समावेश होता.
"चांद्रायण'सारखी कामगिरी करण्याची इच्छा ः राशी लड्डा
बी.टेक अभ्यासक्रमात अभूतपूर्व यश मिळाल्यावर मनात काहीतरी वेगळं करण्याची खूप इच्छा आहे. खगोलशास्त्र अभियांत्रिकी अभ्यासक्रमात आवड असून पुढील शिक्षण त्यातूनच घ्यायचे आहे. "चांद्रायण'सारखी एखादी कामगिरी करण्यावर भर देणार आहे. त्यासाठी विदेशात जाण्याची इच्छा नसून भारतात ते शिक्षण पूर्ण करायचे असल्याची प्रतिक्रिया सर विश्‍वेश्‍वरय्या पदक पटकाविणाऱ्या राशी लड्डा हिने दिली. सध्या ती सध्या मुंबईच्या जे.पी. मॉर्गन कंपनीमध्ये प्रोजेक्‍ट इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. राशी मूळची यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस शहरातील असून तिचे वडील व्यावसायिक आहेत. आई गृहिणी आहे. परिश्रम करा त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल, असा विश्वास तिने व्यक्त केला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: VNIT's convocation in celebration