यवतमाळात होणार मतविभाजन?

File photo
File photo

यवतमाळ : यवतमाळ विधानसभा मतदारसंघात गेल्या दशकापासून सलग दोन वेळा कुणीही विधानसभेत पोहोचले नाही. प्रत्येक वेळी मतदारांनी वेगवेगळ्या उमेदवारांना विधानभवनाचा रस्ता दाखविला आहे. त्यामुळे हा "ट्रेंड' कायम राहणार की, बदलणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
भाजपने पुन्हा एकदा पालकमंत्री मदन येरावार यांच्यावर विश्‍वास टाकला आहे. कॉंग्रेसने उमेदवार बदलून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर यांना उमेदवारी दिली. भाजपचे शहरी भागात नेटवर्क असले तरी कॉंग्रेसची भिस्त ग्रामीण भागावर आहे. तुल्यबळ उमेदवार असल्याने काय होणार, याबाबत राजकीय विश्‍लेषकही ठामपणे मत मांडताना दिसत नाहीत. शहरी भाग भाजपच्या ताब्यात आहे. ही जमेची बाजू असली तरी हेवेदावे व अंतर्गत वर्चस्वाच्या लढाईने पोखरल्याचे चित्र आहे. त्यातच मित्रपक्ष शिवसेना कितपत साथ देणार, हा प्रश्‍न आहे. गेल्या पाच वर्षांत दोन्ही पक्षांत फारसे मनोमीलन झाल्याची एकही घटना घडली नाही. त्यातच शिवसेनेतून बंडखोरी होण्याची शक्‍यताही वर्तविली जात आहे. असे झाल्यास युतीसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्‍यता आहे.
तशीच स्थिती कॉंग्रेस समोरही आहे. गट-तटांत विभागले गेलेले नेते एकसंध झाल्याचे चित्र नाही. उमेदवारीवरूनच उघडपणे दोन गट तयार झाले होते. शिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेसला सन्मान दिला जात नसल्याची भावना मित्रपक्षांमध्ये आहे. अशा स्थितीत यांचे मनोमीलन घडवून आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. भाजपकडे शहरी भाग असल्याचे दावे सुरू आहेत. यवतमाळ तालुक्‍यातील सर्वच जिल्हा परिषद गटांतून विजय मिळविण्याची किमया कॉंग्रेस उमेदवारांनी यापूर्वी केली असल्याचा दावा कॉंग्रेसकडून सुरू आहे. "प्रहार'ने मतदारसंघातील जातीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून कुणबी-मराठा समाजातील युवा चेहऱ्याला पसंती दिली आहे. त्यामुळे "प्रहार'चा हा फॅक्‍टरही निवडणुकीत चुरस निर्माण करणार आहे.
विधानसभा निवडणुकीत मतविभाजनाचा फटका कॉंग्रेसला बसला आहे. तसा भाजपलाही त्यांची किंमत मोजावी लागली आहे. यंदाही मतविभाजन करूनच विजयाचे समीकरण गाठण्याचे मनसुबे आखले जात आहे. त्यामुळे हे समीकरण कोणाला मुंबईचे तिकीट देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विळ्या-भोपळ्याचे संबंध
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मतभेद असले तरी तुटेपर्यंत संबंध ताणले गेलेले नाहीत. या उलटस्थिती भाजप-शिवसेनेमध्ये आहे. दोन्ही पक्षांत विळ्या-भोपळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे कोण कुणाला मदत करणार, यावर प्रश्‍नचिन्ह आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com