विद्यापीठांच्या माध्यमातून होणार मतदार जनजागृती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नागपूर : केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाकडून जागरुकतेसाठी विविध उपक्रम राबविल्यानंतरही लोकसभा, विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आयोगाकडून विद्यापीठांच्या मदतीने "इन्स्टिट्यूट ऑफ डेमॉक्रॉसी अँड इलेक्‍शन फॉर गुड गव्हर्नन्स' नावाने संस्थेची नोंदणी केली आहे. या माध्यमातून राज्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाकडून मतदारांना वारंवार आवाहन करण्यात येऊनही विविध निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढताना दिसून नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अधिकाअधिक मतदारांच्या सहभागाची आवश्‍यकता आहे. त्यासाठी जनजागृती करण्याच्यादृष्टीने निवडणूक आयोगाद्वारे कंपनी ऍक्‍टनुसार या संस्थेची नोंदणी करण्यात आली आहे. संस्थेच्या व्यवस्थापन मंडळामध्ये अध्यक्षस्थानी राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया तर कोषाध्यक्ष म्हणून भि. म. रासकर राहतील. तर सदस्य म्हणून आयोगाचे सचिव किरण कुरंदकर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सि. प. काणे, गोखले इन्स्टिट्यूटचे राजस परचुरे, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मचे अमित रानडे यांचा समावेश आहे.
याशिवाय भविष्यात इतर राज्यांतील निवडणूक आयुक्तांचा त्यात गरजेनुसार समावेश करण्यात येईल. संस्थेसाठी राज्य सरकारकडून पाच कोटींचा तर पाच विद्यापीठांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. संस्थेच्या कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली असून, या मतदार जनजागृतीसाठी विविध राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही उपक्रम, चर्चासत्र घ्यायचे निश्‍चित करण्यात आले. याशिवाय "उत्सव लोकशाहीचा' या नावाने राज्यस्तरावर उपक्रम राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या संस्थेद्वारे या विषयावरील संशोधनासाठीही चालना देण्यात येणार असून त्यासंबंधित अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या पुढाकाराने मतदार जनजागृती करण्याच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगामार्फत संस्था तयार करण्यात आली आहे. यामध्ये प्रथमच तीन विद्यापीठांचा सहभाग असल्याने त्याद्वारे प्रभावीपणे काम होणार आहे.
-डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू, नागपूर विद्यापीठ

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: voter awareness Through universities