Loksabha 2019 : मतदार जातीचे नाही कामाचे मूल्यांकन करतात - गडकरी

राजेश चरपे  
बुधवार, 10 एप्रिल 2019

भाजपचे उमेदवार तसेच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. शहरात पाच वर्षांत केलेली सुमारे सत्तर हजार कोटींची विकासकामे, नागपूरकरांचा विश्‍वास आणि जनतेच्या वाढत्या प्रतिसादामुळे त्यांना यंदा सुमारे पाच लाखांच्या मताधिक्‍याने विजयी होण्याच्या विश्‍वास आहे.

नागपूर - भाजपचे उमेदवार तसेच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. शहरात पाच वर्षांत केलेली सुमारे सत्तर हजार कोटींची विकासकामे, नागपूरकरांचा विश्‍वास आणि जनतेच्या वाढत्या प्रतिसादामुळे त्यांना यंदा सुमारे पाच लाखांच्या मताधिक्‍याने विजयी होण्याच्या विश्‍वास आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पाच वर्षांतील वाटचाल, पुढील आव्हाने आणि राजकीय परिस्थिती याविषयी त्यांनी "सकाळ'शी त्यांनी केलेली बातचीत. 

14 आणि 19 च्या निवडणुकीत काय फरक वाटतो? 
2014 सालची माझी पहिली निवडणूक होती. तत्पूर्वी महाराष्ट्राचा सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून मी केलेल्या चांगल्या कामांमुळे येथील जनतेने मला प्रचंड बहुमताने निवडून दिले. पाच वर्षांपासून शहरात कोट्यवधींची विकासकामे सुरू आहेत. अनेक नामवंत शैक्षणिक संस्था येथे आल्या आहेत. मेट्रो रेल्वे धावायला लागली. शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. हा बदल जनता टीपत आहे. याचे ते ऑडिट करतील आणि मतदान करतील. 

मोदी लाट ओसरली आहे असे वाटते काय? 
2014 साली निश्‍चितच भाजपची लाट होती. त्याहीपेक्षा कॉंग्रेसवर प्रचंड नाराजी होती. जनतेला बदल हवा होता. सोबतच आमच्याकडून मोठ्या अपेक्षाही होत्या. त्यामुळे सत्तापरिवर्तन झाले. आम्हीसुद्धा जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या. पन्नास वर्षांत झाली नाही तेवढी कामे आम्ही पाच वर्षांत केली. आता याच कामांकडे बघून जनता पुन्हा भाजपला मतदान करेल. 

ओबीसी भाजपवर नाराज आहे असे वाटते का?  
असे मुळीच वाटत नाही. उलट ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही वैधानिक व्यवस्था करून दिली. ओबीसींच्या आर्थिक विकासासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिले. याचा संपूर्ण समाजाला फायदा होत आहे. 

नागपूरमध्ये जात फॅक्‍टर कितपत चालेल?  
आजवरच्या निवडणुकीत नागपूरकरांनी जात पाहून मतदान केल्याचे दिसत नाही. मात्र, काही लोक जातीचा दाखला देऊन फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. नागपूरकरांना विकास हवा आहे. "कास्टिजम' करून विरोधकांना काही लाभ होईल, असे वाटत नाही. आम्ही विकासासाठी मत मागत आहोत. गुणवत्तेचे मूल्यांकन जनता करते. त्यामुळे येथे जात फॅक्‍टर चालणार नाही. 

राज ठाकरे यांच्याबाबत काय सांगाल? 
राज ठाकरे यांचे आजवरचे राजकारण आणि यंदा त्यांनी घेतलेली भूमिका परस्पर विरोधी आहे. ती सर्वांनाच "कन्फ्युज' करणारी आहे. ते कॉंग्रेसला का समर्थन करीत आहे हे आपल्या समजण्यापलीकडचे आहे. 

मागासवर्गीय भाजपवर नाराज का आहेत? 
मागासवर्गीय समाज भाजपवर नाराज नाही. मात्र, कॉंग्रेसची मंडळी मतांसाठी जातीय विष कालवत आहेत. यात ते यशस्वी होणार नाही. भाजपच्या कार्यकाळात दीक्षाभूमीला अ दर्जा मिळाला. बाबासाहेब आंबेडकर याचे लंडनचे घर भाजपच्या कार्यकाळात खरेदी करण्यात आले. इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाला सुरुवात झाली. यशवंत स्टेडियम येथे बाबासाहेबांच्या नावाने मोठे सभागृह उभारले जाणार आहे. याउलट कॉंग्रेसने 80 वेळा घटनेत बदल केला. आता आमच्या नावाने बोंबा ठोकल्या जात आहेत. 

राहुल व प्रियांका गांधीबाबत आपले मत?  
राहुल गांधी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सत्ताधाऱ्यांना विरोध करणे त्यांचे कामच आहे. त्यांना आपले नेतृत्व सिद्ध करण्याची संधी होती. मात्र, स्वतःच्या वागण्या-बोलण्यातून ती त्यांनी गमावली. त्यांचे मित्रपक्षचे त्यांचे नेतृत्व स्वीकरण्यास तयार असल्याचे दिसून येत नाही. प्रियांका गांधी यांची चर्चा प्रत्यक्ष कामापेक्षा मीडियातच अधिक आहे. यापेक्षा जास्त काही नाही. 

इंदूरमधून लढणार असल्याची चर्चा आहे? 
मी नागपूरमधूनच मोठ्या मताधिक्‍याने निवडून येणार आहे. याची मला शंभर टक्के खात्री आहे. त्यामुळे इंदूर येथून लढण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. आमचे विरोधक पराभवाच्या भीतीने अशा अफवा पसरवून घाणेरडे राजकारण करीत आहेत. यात काही तथ्य नाही. 

नागपूरसाठी आणखी काय करणार? 
नागपूरची मेट्रो रेल्वे आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. एअरपोर्टसुद्धा तसेच होऊ घातले आहे. एम्स्‌, आयआयटी, ट्रीपल आयटी, लॉ युनिर्व्हसिटी येथे आल्या आहेत. मिहानमधील अनेक कंपन्या टेकऑफच्या स्थितीत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात येथे रोजगार उपलब्ध होणार आहे. येत्या काळात आणखी 50 हजार रोजगाराची निर्मिती केली जाईल. पायाभूत सुविधांसोबतच शहराचा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक असा सर्वांगीण विकास भविष्यात केला जाईल. 

Web Title: Voters evaluate the work not caste says nitin gadkari