मतदार घडविणार, बिघडविणार भाग्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, आचारसंहिता जाहीर झाली आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवल्याने लढतीचे चित्र अस्पष्ट आहे. गेल्या 2014च्या निवडणुकीपेक्षा यंदा दीड लाखाने मतदारसंख्येत वाढ झाली आहे. हे मतदारच उमेदवारांचे भाग्य घडविणार आणि बिघडविणार आहेत.

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, आचारसंहिता जाहीर झाली आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवल्याने लढतीचे चित्र अस्पष्ट आहे. गेल्या 2014च्या निवडणुकीपेक्षा यंदा दीड लाखाने मतदारसंख्येत वाढ झाली आहे. हे मतदारच उमेदवारांचे भाग्य घडविणार आणि बिघडविणार आहेत.

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच सातही विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढली आहे. आघाडी-महायुतीचे स्पष्ट ठरताना दिसत नाही. राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करताना सावध पवित्रा घेतला जात आहे. वेळेवर बंडखोरीची अस्त्र उगारले जावू नये, यासाठी इच्छुक व दावेदारांना "चॉकलेट' दाखविले जात आहे. चार ऑक्‍टोबरपर्यंत नामांकन दाखल करता येणार असल्याने घटस्थापना झाल्यानंतरच नामांकनाच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. निवडणूक रिंगणातील चित्र सध्या अस्पष्ट असले तरी इच्छुक उमेदवार मतदारसंख्येवरून विजयाचा दावा करीत सुटले आहेत. गेल्या 2014च्या निवडणुकीत 20 लाख 26 हजार 200 इतकी मतदारसंख्या होती. गेल्या 2019मध्ये मतदारांचा आकडा 21 लाख 72 हजार 205च्या घरात पोहोचला आहे. एक लाख 46 हजार पाच मतदारांची वाढ झाली आहे. वणी विधानसभा क्षेत्रात 15 हजार 647, राळेगाव 13 हजार 502, यवतमाळ 40 हजार 581, दिग्रस 26 हजार 296, आर्णी 24 हजार 582, पुसद 11 हजार 523, तर उमरखेड विधानसभा मतदारसंघात 13 हजार 874 मतदार वाढले आहेत. वाढलेले मतदार कुणाच्या पारड्यात आपले मत टाकतात, यावर उमेदवारांचे विजयी गणित अवलंबून राहणार आहे. उमेदवारीवरून राजकीय पक्षातील वातावरण तापत असले तरी सातही मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडायचा आहे. घटस्थापना होताच गावागावांत राजकारणाचा फड चांगलाच रंगणार आहे. त्यासाठी मतदारांना अवघे काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

यवतमाळ सर्वाधिक मोठा मतदारसंघ
जिल्ह्यात सात मतदारसंघ असले तरी मतदारसंख्येच्यादृष्टीने यवतमाळ मतदारसंघ सर्वांधिक मोठा ठरत आहे. गेल्या 2014मध्ये या मतदारसंघात तीन लाख 43 हजार 558 मतदार होते. गेल्या 2019च्या निवडणुकीसाठी तीन लाख 84 हजार 139 मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यंदा 40 हजार 581 मतदार वाढले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voters will create, spoil destiny