माओवाद्यांचा विरोध झुगारून गडचिरोलीत दिसला उत्साह

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

  • दिग्रसमध्ये भाजप-सेना कार्यकर्त्यांमध्ये राडा
  • महागाव येथे दोन गटात हाणामारी
  • चार गावांत बहिष्कार, एका गावात 5 जणांनी दिले मत
  • करंजी (चंद्रपूर) येथे कॉंग्रेस उमेदवाराकडे दारू जप्त
  • सोशल मीडियावर तणावाच्या अफवांचे पिक
  • आईच्या मृत्यूनंतरही बजावला मतदानाचा अधिकार
  • मतदारयादीतील घोळाच्या तक्रारी कायम

नागपूर : विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान तुरळक घटना वगळता शांततेत पार पडले. जिल्हा परिषदेच्या 256 गटांसाठी व 512 गणांसाठी आज मतदान झाले. यवतमाळ जिल्ह्यात दोन ठिकाणी, तर चंद्रपूर जिल्ह्यात एका ठिकाणी मारहाणीच्या घटना झाल्यात. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांचा विरोध झुगारून उत्स्फूर्त मतदान झाले. विदर्भात सर्वत्र 70 टक्‍क्‍यांच्या आसपास मतदान झाल्याचा अंदाज आहे.

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा व बुलडाणा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी मतदान सकाळी 7 वाजता सुरू झाले. गडचिरोली जिल्ह्यात दोन टप्प्यात निवडणुका होणार असून पहिल्या टप्प्यात आठ तालुक्‍यांमध्ये आज मतदान झाले. नक्षलवाद्यांनी बहिष्काराचे आवाहन केल्यानंतरही गडचिरोलीत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात सर्वत्र पोलिसांचा चांगलाच बंदोबस्त होता. प्राथमिक माहितीनुसार येथे 70 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. मतदान केंद्राच्या बाहेर नागरिकांच्या रांगा पहायला मिळत होत्या.

बुलढाणा जिल्ह्यात दहीवडी (ता. नांदुरा) व मोळी (ता. मेहकर) व वर्धा जिल्ह्यात मोई (ता. आष्टी) व वागधरा (ता. वर्धा) या चार गावांतील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. त्यामुळे एकही मतदार मतदान केंद्राकडे फिरकला नाही. वर्धा जिल्ह्यातील विखनी (ता. समुद्रपूर) येथे केवळ पाच जणांनीच मतदान केले. बुलढाणा जिल्ह्यात जवळा (ता. मेहकर) येथील गावकऱ्यांनीही बहिष्कार टाकला होता. परंतु खासदार प्रतापराव जाधव यांनी समजूत काढल्याने 700 पैकी 100 गावकऱ्यांनी मतदान केले.
यवतमाळ जिल्ह्यातील कळसा (ता. दिग्रस) येथील मतदान केंद्रावर भाजप उमेदवार बाबूसिंग जाधव व त्यांच्या समर्थकांनी शिवसेना कार्यकर्ते राहुल शिंदे यांना मारहाण केली. दोघांनीही दिग्रस पोलिस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. किरकोळ कारणावरून हा वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याच जिल्ह्यातील महागाव तालुक्‍यातील कोनदरी येथील मतदान केंद्रावरही दोन गटात हाणामारी झाली. एका गटाच्या कार्यकर्त्याने मतदाराला विशिष्ट उमेदवारालाच मतदान करण्याविषयी सुचविले. यावर विरोधी गटाच्या प्रतिनिधीने आक्षेप घेतला. त्यावरून दोन गटात जुंपल्याचे सांगितले जाते. तक्रारीवरून आठ आरोपींवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात निंदाळा-बाळापूर (ता. नागभीड) येथे पैसे वाटत असल्याचा आरोप करून भाजपा कार्यकर्तांनी शिवसेना उमेदवारावर हल्ला केला. या प्रकरणीही पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याच जिल्ह्यातील सोमनपल्ली (ता. गोंडपिंपरी) येथील मतदान केंद्रावर पोलिसांनी नागरिकांवर लाठीमार केल्याची चर्चा होती. मात्र पोलिसांनी ती अफवा असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यात दारूबंदी असतानाही गोंडपिंपरी येथे पोलिसांनी एका कॉंग्रेस उमेदवाराच्या घरूनच 20 लिटर दारू जप्त केली.
सवना (ता. महागाव) येथील दिलीप देशमुख यांच्या आईचे आज, गुरुवारी निधन झाले. तरीही श्री. देशमुख आपले राष्ट्रीय कर्तव्य विसरले नाही. आईचे पार्थिव घरात असतानाही त्यांनी मुलाला सोबत घेऊन मतदानाचा हक्‍क बजावला. त्यानंतर आईच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार केले.

मतदान यंत्र बंद पडल्याने गोंधळ निर्माण होण्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या, तर अनेक ठिकाणी मतदारयादीतील घोळांमुळेही अनेकांना मतदान न करताच हिरमुसले होऊन परतावे लागले.

Web Title: voting at gadchiroli despite maoists threat