स्मृतिमंदिरात वाढली व्हीव्हीआयपींची वर्दळ

स्मृतिमंदिरात वाढली व्हीव्हीआयपींची वर्दळ
नागपूर : संघ परिवारातील स्वयंसेवकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेशीमबागातील स्मृतिमंदिरात गेल्या दोन वर्षांपासून संघाशी संबंध फारसा नसलेल्या व्हीव्हीआयपींची वर्दळ वाढली आहे. देशातीलच नव्हे, तर विदेशातील नेतेसुद्धा स्मृतिमंदिराला भेट देऊन संघसंस्थापक डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजींच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. विशेष म्हणजे या अतिविशिष्ट लोकांच्या या भेटींबाबत संघ पदाधिकाऱ्यांकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
शतक महोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थापकांचे हे समाधीस्थळ रेशीमबाग परिसरात 1962 साली बांधण्यात आले. या स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी स्वयंसेवक आतुर असतात. अनेक स्वयंसेवक तर आठवण म्हणून संघभूमीची माती घेऊन जातात. मात्र, आता आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नेतृत्व करणारी मंडळी संघकार्याकडे सकारात्मक दृष्टीने बघत आहेत. मे 2018 साली तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी घेतलेल्या संघदर्शनापासून ते अगदी काल-परवा ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांच्या दर्शनापर्यंत सगळ्यांचाच विचार केल्यास, संघाकडे पाहण्याचा कल बदलत असल्याचे जाणवते. यापूर्वी अभिनेते व खासदार सनी देओल यांनीही समाधीस्थळाला भेट दिली. चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री व अभिनेत्री पल्लवी जोशी यांनीही स्मृतिमंदिराचे दर्शन घेतले व सरसंघचालकांशी दीर्घकाळ चर्चा केली आहे. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा दोनदा संघदरबारी येऊन गेले असून, संरसंघचालकांशी संवाद साधतानाचे त्यांचे फोटोही प्रसिद्ध झाले आहेत. 24 मे रोजी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी रेशीमबागेत येऊन समाधीचे दर्शन घेतले. इतकेच नव्हे, तर धर्मगुरू श्री श्री रविशंकर, दलाई लामा, रामदेव बाबांनीही स्मृतिमंदिराचे दर्शन घेतले आहे. माजी राष्ट्रपती स्व. अब्दुल कलाम यांनीही स्मृतिमंदिराचे दर्शन घेतले आहे.
स्मृतिमंदिराचा इतिहास
21 जून 1940 साली महाल येथील संघाच्या मुख्यालयात संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनी देह ठेवला. त्यांच्या पार्थिवावर रेशीमबागेत अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथेच नंतर स्मृतिमंदिराची निर्मिती करण्यात आली. 9 एप्रिल 1962 साली गुढीपाडव्याला द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या हस्ते स्मृतिमंदिराचे उद्‌घाटन करण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे गोळवलकर गुरुजींच्या पार्थिवावरही येथेच अंत्यसंस्कार करण्यात आल्याने या स्थळाला संघपरिवारात विशेष महत्त्व आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com