‘ते’ साडेदहा कोटी वाधवानींच्या लॉकर्समधील

Businessman
Businessman

नागपूर - हैदराबादजवळ अलीकडेच एका वाहनात सापडलेले साडेदहा कोटी रुपये शहरातील मिरची व्यापारी प्रकाश वाधवानी यांच्या लॉकर्समधून पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याच माहितीच्या आधारावर प्राप्तिकर विभागाने वाधवानी यांच्या निवासस्थान, लॉकर्ससह चार ठिकाणांवर सोमवारी सकाळी छापे टाकले. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. त्यांच्या कार्यालयातील सर्वच लॉकर सील केले आहेत. 

छापा पडल्यापासून वाधवानी यांच्या लॉकर्सचा व्यवस्थापक एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल झाला आहे. त्यामुळे ही रक्कम कोणाला दिली जाणार होती हे कळू शकले नाही. मात्र हवालामार्फत ती पोहोचविल्या जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिरची आणि कोल्ड स्टोअरचे व्यापारी प्रकाश वाधवानी यांचे इतवारी येथे अधिकृत लॉकर सुविधा असून त्याचे संचालन ते करतात. त्यांच्या कार्यालयात २०० ते २२५ लॉकर्स आहेत. यात इतवारीतील अनेक मोठे व्यापारी आपली रोख ठेवतात.

हे लॉकर प्राप्तिकर विभागाने रविवारी सील केल्यापासून अनेक व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. लॉकरमध्ये अनेक व्यापाऱ्यांचे अघोषित कोट्यवधी रुपये असल्याची शक्‍यता आहे. दरम्यान, काही व्यापाऱ्यांना आज प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती आहे.  हैदराबादकडे जाणाऱ्या वाहनात पकडलेली रक्कम नागपुरातील असल्याचे चालकांनी सांगितले. त्यानंतर तातडीने वरिष्ठ प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील प्राप्तिकर विभागाला कळविले. त्यानंतर विभागानेरविवारी रात्रीपासूनच कारवाईला सुरुवात केली. रात्रीच वाधवानी यांच्या इतवारी येथील कार्यालयाला सील लावण्यात आले होते. सोमवारी सकाळीच कारवाईस प्रारंभ झाला. दरम्यान, वाहनाचा चालक रामदासपेठ येथील एका मोठ्या हॉटेलमध्ये मुक्कामाला होता अशी माहिती आहे. त्या माहितीच्या आधारे हॉटेलची चौकशी करण्यात येत आहे. तसेच साडेदहा कोटींची रक्कम पाच पोत्यांमध्ये होती. त्यामुळे ती पोती कोठून आणली अथवा खरेदी केली याचाही तपास करण्यासाठी काही दुकानदारांची चौकशी केली जात असल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले. लॉकर्सचा व्यवस्थापक जोपर्यंत अतिदक्षता कक्षातून बाहेर येणार नाही तोपर्यंत कोणतीही माहिती पुढे येण्याची शक्‍यता कमी आहे. प्राप्तिकर विभागाची कारवाई सलग दुसऱ्याही दिवशी सुरू होती. यात अंदाजे २५ ते ३० अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत.

प्राप्तिकर विभागाचे अधिकारी  लॉकर्सच्या व्यवस्थापकाच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. तब्येत सुधारल्यानंतर त्याची चौकशी केली जाणार आहे. त्या चौकशीत आपली नावे समोर येतील या भीतीने अनेक व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हरविले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com