वैनगंगेच्या प्रदूषणाचा 186 गावांना धोका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

भंडारा : जिल्ह्यातील वैनगंगेचे प्रदूषण सतत वाढत असल्याने नदीतील पाणी पिण्यास व वापरासाठी धोकादायक ठरले आहे. त्यामुळे भंडारा व पवनी या शहरांसह जिल्ह्यातील 186 गावांना धोका निर्माण झाला आहे. तेव्हा वैनगंगेच्या प्रदूषणाची तपासणी करण्यासाठी नीरीला योग्य आदेश देण्यात यावे अशी मागणी वैनगंगा जल प्रदूषण निर्मुलन समितीने केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे केली आहे.

भंडारा : जिल्ह्यातील वैनगंगेचे प्रदूषण सतत वाढत असल्याने नदीतील पाणी पिण्यास व वापरासाठी धोकादायक ठरले आहे. त्यामुळे भंडारा व पवनी या शहरांसह जिल्ह्यातील 186 गावांना धोका निर्माण झाला आहे. तेव्हा वैनगंगेच्या प्रदूषणाची तपासणी करण्यासाठी नीरीला योग्य आदेश देण्यात यावे अशी मागणी वैनगंगा जल प्रदूषण निर्मुलन समितीने केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे केली आहे.
समितीच्या निवेदनानुसार, वैनगंगा नदीच्या काठावरील भंडारा शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठ्याची जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची आहे. मात्र, शहरातील नागरिकांना नळाद्वारे दूषित व पिण्यास अयोग्य पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच नदीच्या काठावरील भंडारा व पवनी तालुक्‍यातील शेकडो गावे जलप्रदुषणामुळे प्रभावित झाली आहेत.
नागपूर महानगर पालिका क्षेत्रातील दूषित व रसायनयुक्त पाणी नाग नदीद्वारे कन्हान व नंतर वैनगंगा नदीत सोडले जाते. यामुळे वैनगंगेवरील गोसेखुर्द धरणाचे पाणी दूषित झाले आहे. यामुळे शहर व ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे कर्करोग, त्वचारोग, कावीळ, हगवण आदी अनेक आजारांचे प्रमाण वाढले आहे.
या दूषित पाण्यामुळे नागरिकांना आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत असून वैनगंगेतील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. या नदीच्या काठावर वसलेले मासेमारांचा व्यवसायावर प्रदूषणाचा परिणाम झाला आहे. नदीच्या परिसरातील पर्यावरण, शेतातील पिकांवर दुष्परिणाम होत आहे. नदीतील दूषित बॅकवॉटरमुळे अनेक पाणीपुरवठा योजना, जलशुद्धीकरण संयत्र धोक्‍यात आले आहे. पाण्यात वाढलेल्या जलपर्णी वनस्पतीमुळे प्रदूषणात वाढ होत आहे.
भंडारा शहरातील नागरिकांनी पाणीपुरवठा योजनेद्वारे पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याचा पिण्यास वापर करणे बंद केले आहे. त्यामुळे शहरातील 50 हजार कुटुंबाला पिण्याच्या पाण्यासाठी अतिरिक्त खर्चाचा भार उचलावा लागत आहे. दूषित पाण्यामुळे या भागात जलजन्य आजारांच्या प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचा परिणाम नदीकाठावरील 186 गावांवर होत आहे. तेव्हा नागपूर महानगरपालिकेने नाग नदीचे प्रदूषण थांबवून नदीच्या विकासाचा प्रकल्प तयार करावा, दूषित पाण्यावर प्रक्रिया करूनच सोडण्यात यावे, नाग नदीचे दिशा परिवर्तन करावे, दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पॉवर प्लांटला पुरवठा करण्यात यावा, वैनगंगेच्या प्रदूषण तपासण्याचे नीरीला आदेश देण्यात यावे, 2018 मध्ये नगर परिषदेला नवीन पाणीपुरवठा योजना देण्यात आली. परंतु, नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत काहीही झाले नाही. त्यामुळे येथील पाणीपुरवठा योजना राज्य शासनाने आपल्या स्तरावर करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

अनेक वर्षांपासून वैनगंगेच्या प्रदूषणावर जनतेकडून शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. परंतु, लोकप्रतिनिधी व नेत्यांनी याची गंभीर दखल घेतली नाही. आता आम्ही केंद्र सरकारकडे वैनगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
-सत्तार खान
अध्यक्ष, वैनगंगा जलप्रदूषण नियंत्रण समिती भंडारा.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wangange pollution risks 186 villages