यवतमाळमधील कचराप्रश्‍नावर नगरसेवक आणि नागरिक संतप्त; समस्या लवकर निकाली काढण्याची मागणी

ward members and people in yavatmal are seeking to clean garbage
ward members and people in yavatmal are seeking to clean garbage

यवतमाळ : शहरातील कचराप्रश्‍न गेल्या तीन, चार वर्षांत समोर आला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. दोन दिवस स्वच्छता केल्यानंतर तिसऱ्या दिवसांपासून पुन्हा कचऱ्यांचे ढिगारे साचत असल्याचे चित्र शहरातील अनेक भागात दृष्टीस पडले. हे नित्याचे झाले आहे. त्यामुळे नागरिक प्रश्‍न विचारत असल्याने आता कचऱ्याच्या प्रश्‍नावर नगरसेवक आक्रमक झाले आहे. 

नागरिकांनी पालिकेच्या कारभाराविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शहरातील घनकचरा व्यवस्थापन तसेच घंटागाडीवर वार्षिक साडेसात कोटी रुपये खर्च केला जातो. यानंतरही शहरातील स्वच्छता होत नाही. अनेक प्रभागात आठ-आठ दिवस कचरा गाडी येत नसल्याची ओरड नगरसेवकच करतात. असे असतानाही यावर अजूनही अंकुश लावण्यात पालिका प्रशासनाला यश आलेले नाही.

या प्रश्‍नावर जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच मुख्यधिकारी यांची बैठक झाली होती. त्यांनीच त्यावर तोडगा काढला, मात्र, अजूनही काय झाले हे समजू शकले नाही. कचऱ्याच्या विरोधात उपोषण झाले, आंदोलन झाले, सभागृहात नगरसेवकांनी प्रश्‍न उपस्थित केले. यानंतरही पालिका प्रशासनाकडून या प्रश्‍नावर दखल घेण्यात आली नाही.

'सर्व गटनेत्यांनी एकत्रित कंत्राट रद्द करण्याची मागणी केली होती. असे असतानाही पालिका प्रशासन नागरिकांच्या हितासंदर्भात निर्णय का घेत नाही असा प्रश्‍न आहे.
-चंद्रशेखर चौधरी, 
विरोधी पक्ष नेते तथा गटनेते कॉंग्रेस

शहरातील कचरा प्रश्‍नावर बोलून बोलून आम्ही थकलो आहोत. अनेकवेळा या मुद्यावर कारवाईची मागणी केली. परंतु, प्रशासन काहीही करण्याच्या मन:स्थितीत दिसत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही कारवाई झालेली नाही. शहरात कचरा प्रश्‍न मोठा आहेच. नव्याने पालिका हद्दीत आलेल्या काही भागात तर वाहनेही पोहोचत नाही. नगरसेवकांनाच स्वच्छता करून घ्यावी लागते. कचरा डेपो नसल्यानेही अडचणी येत आहे. या सर्व मुद्यावर लवकर निर्णय होणे गरजेचे आहे. त्यापेक्षाही कचरा कंत्राट दिलेल्याकडून पालिकेने काम करून घेणे आवश्‍यक आहे.
-पंकज मुंदे,
 नियोजन सभापती तथा गटनेते राष्ट्रवादी कॉंग्रेस.

शहराची नियमित स्वच्छता आवश्‍यक आहे. कोट्यवधी रुपये यावर खर्च केला जातो. मात्र, कंत्राटदाराने स्वच्छता केल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. घंटागाडीची स्थिती अत्यंत बेकार झाली आहे. माझ्या प्रभागातील घंटागाडी गेल्या महिनाभरापासून बंद आहे. प्रत्येक प्रभागात घंटागाडीच्या सहा फेऱ्या झाल्यास शहरात कुठेही कचरा दिसणार नाही. मात्र, करारात या गोष्टी नमूद असतानाही कारवाई होत नाही. ही शोकांतिकाच आहे. कचरा कंत्राट संपल्याने मुदतवाढ देण्यापेक्षा पालिकेने स्वत: कर्मचारी लावून कचरा संकलन केल्यास फरक दिसून येईल.
-गजानन इंगोले,
 गटनेता शिवसेना.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com