वर्धा : वाळू व्यावसायिकाने घेतले तहसीलदारांच्या कक्षात विष

पकडलेला टिप्पर सोडण्याची होती मागणी
Wardha illegally sand transporting revenue department truck seized
Wardha illegally sand transporting revenue department truck seizedsakal

समुद्रपूर : अवैधरीत्या वाळूची वाहतूक करताना महसूल विभागाने टिप्पर जप्त केला. हा टिप्पर सोडविण्यासाठी तालुक्यातील मांडगाव येथील वाळू व्यावसायिकाने चक्क तहसीलदारांच्या कक्षात त्यांच्या समोरच विष प्राशन केले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्नपूर्णा बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स या नावाने प्रवीण शंकर शेंडे (वय ३५, रा. मांडगाव) याचा वाळूचा व्यवसाय आहे. वणा नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करताना महसूल विभागाच्या पथकाने प्रवीण शंकर शेंडे याचा टिप्पर जप्त केला. यामुळे आर्थिक कोंडी झाल्याने प्रवीण शेंडे अस्वस्थ होता. शुक्रवारी दुपारच्या सुमारास प्रवीण याने तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या कक्षात जाऊन तहसीलदार राजू रणवीर यांच्याकडे टिप्पर सोडण्याची विनवणी केली.

तहसीलदार राजू रणवीर यांनी सदर प्रकरणातील अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला असल्याने हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे सुचविले. यामुळे व्यथित होऊन प्रवीण शेंडे याने आपल्या खिशातून विषाची डबी काढून तोंडाला लावली. ही बाब निदर्शनास येताच तहसीलदारांनी प्रवीणकडे धाव घेतली. त्याच्या हातातील विषाची डबी हिसकली. यादरम्यान प्रवीण शेंडे याच्या तोंडात विषाचे काही थेंब गेले, असा प्राथमिक अंदाज आहे.

तहसीलदार राजू रणवीर यांनी प्रवीण शेंडे याला तातडीने उपचारासाठी तहसील कार्यालयाच्या वाहनाने समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, यानंतर पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या घटनेने तालुका प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. समुद्रपूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

जिल्ह्यात सर्वत्र वाळूचोरी

वर्धा जिल्ह्यात आजघडीला मोजक्याच घाटांचा लिलाव झाला आहे. असे असले तरी येथे मोठ्या प्रमाणात वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे. यावर प्रशासनाकडून काही ठिकाणी कारवाई होते तर काही ठिकाणी ती सहज टाळण्याचा प्रकार सुरू आहे. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com