प्राथमिक शिक्षक गिरवणार "निष्ठा'चे धडे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

राज्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीत शिकविणाऱ्या शिक्षकांसह मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांसाठी निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. चार ते 23 डिसेंबरदरम्यान राज्यात जिल्हानिहाय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे.

नंदोरी (जि. वर्धा) :  केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीत शिकविणाऱ्या शिक्षकांसह मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांसाठी निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. चार ते 23 डिसेंबरदरम्यान राज्यात जिल्हानिहाय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शिक्षण विभागाला आदेश दिले आहेत. 

या विषयांचा होणार समावेश 

No photo description available.

निष्ठाअंतर्गत राज्याचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी राज्य व तालुकास्तरावर हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अध्ययन निष्पत्ती, क्षमता व आधारित अध्ययन व मूल्यांकन, शाळा सुरक्षितता व सुरक्षा, विद्यार्थी केंद्रित अध्यापनशास्त्र, वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्ये, समावेशित शिक्षण, अध्ययन अध्यापनात माहिती व तंत्रज्ञानासह कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर, आरोग्य व योगा, ग्रंथालय, पर्यावरण क्‍लब, शालेय नेतृत्व गुणवैशिष्ट्ये, पर्यावरणविषयक जाणीवजागृती, शाळापूर्व शिक्षण, आनंददायी वातावरणात शाळा पातळीवरील मूल्यमापन आदी विविध विषयांचा निष्ठा प्रशिक्षणात समावेश करण्यात येणार आहे. 

पाच तज्ज्ञ मार्गदर्शकांची निवड 

Image may contain: 2 people, people sitting and indoor

या प्रशिक्षणासाठी जिल्हास्तरावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन व आवश्‍यक कार्यवाही करण्याची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांची असणार आहे. नोडल अधिकारी म्हणून या संस्थेचे प्राचार्य राहणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्‍यांची संख्या विचारात घेऊन प्रतितालुका पाच तज्ज्ञ मार्गदर्शकांची राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. यात मराठी व इंग्रजी भाषातज्ज्ञ, विज्ञान, गणित, सामाजिकशास्त्र तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. 

तीन बायकांच्या दादल्याची अजबगजब कहानी वाचली का?

दर्जेदार कार्यक्रम घ्या 

निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रम हा केंद्र शासनाचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. सर्व प्रशासकीय अधिकारी व पर्यवेक्षीय अधिकारी यांनी प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाचा दैनंदिन तपशील, उपस्थितीपूर्व चाचणी व उत्तर चाचणी, प्रशिक्षण केंद्राबद्दल प्रत्याभरण व नियोजन केंद्र शासनास सादर करावे लागणार आहे. त्यामुळे कार्यक्रम दर्जेदार घ्यावेत, असे आदेश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, विद्या प्राधिकरणाचे प्रादेशिक उपसंचालक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य जि. प. चे प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, तसेच महापालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांना बजावले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wardha : nishtha training program for teachers