धानखरेदीला गोदामांचा खोडा

file photo
file photo

भंडारा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. गेल्या पाच वर्षांपासून धानाच्या उत्पादनात विक्रमी भर पडल्यामुळे शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर धानाची आवक सातत्याने वाढत आहे. तथापि, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे खरेदी केलेले धान ठेवण्यासाठी पुरेसे गोदाम उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी होते. दिवाळी संपल्यानंतर आधारभूत केंद्रामार्फत खरेदी सुरू होईल. त्यामुळे यावेळीसुद्धा गोदामांच्या तुटवड्यामुळे मोठी समस्या निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 
यावर्षी चांगले पर्जन्यमान व निसर्गाने साथ दिल्यामुळे भरघोस धान उत्पादन होण्याची शाश्‍वती आहे. याशिवाय गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात दरवर्षीपेक्षा दुप्पट व तिपटीने धानविक्रीचा वेग वाढला आहे. शासनाकडून आधारभूत केंद्रावर हमी भावाने धान खरेदी केली जाते.
शिवाय रक्कमसुद्धा शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होते. त्यावर बोनससुद्धा प्राप्त होतो. आदी कारणामुळेही शेतकरी खासगी व्यापाराला धान न विकता शक्‍यतोवर केंद्रावरच धान विकण्यास प्राधान्य देत आहेत. साहजिक धान विक्रीचे प्रमाण वाढल्याने खरेदी केलेले धान साठविण्यासाठी पर्याप्त प्रमाणात गोदामांची आवश्‍यकता आहे. परंतु, याबाबतीत शासन फारसे गंभीर नाही. भाड्याचे दरही कमी असल्याने खासगी गोदाम भाड्याने देण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे दरवर्षी गोदामांची टंचाई हा विषय कायम ऐरणीवर असतो. भंडारा जिल्ह्यात मागील वर्षी 22 लाख क्विंटल धान खरेदी झाली. धान ठेवण्यासाठी 170 ते 200 गोदामे भाड्याने घेण्यात आले. या गोदामांची साठवणूक क्षमता 3 लाख क्विंटल आहे. या गोदामातील धान राइस मिलर्सकडून भरडाई करून तांदूळ जिल्हा पुरवठा विभागाकडे हस्तांतरित केले जातात. दरम्यान ऐन हंगामात धान ठेवण्यासाठी जागा नसते. गोदामे तुडुंब भरली असल्याने अनेकवेळा धानखरेदी प्रभावित होण्याची समस्या दरवर्षी निर्माण होते. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले धान उघड्यावर पडून राहते. प्रसंगी पावसात सापडल्यास धान सडण्याची खराब होण्याचीसुद्धा भीती असते.धान खरेदी लवकरच सुरुवात होईल, अशात या विभागाला अद्यापही गोदामे उपलब्ध करून दिली नाही. यंदा चांगल्या उत्पादनाची हमी असल्याने गोदामांसाठी पूर्वनियोजन करणे क्रमप्राप्त आहे.

गोदाम भाडे प्रलंबित 
शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेले धान ठेवण्यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे गोदामे भाड्याने घेतली जातात. वर्षभर साठवणूक केली जाते तरी, शासनाकडून फक्त दोन महिन्याचे भाडे देण्याचे धोरण आहे. त्यासाठी प्रतिक्विंटल दोन रुपये 40 पैसे दर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आखून दिलेल्या कमी दराने गोदाम भाड्याने मिळूनही त्यांना भाड्याची रक्कम देण्यास विलंब करणे अनाकलनीय आहे. गोदाम मालकांना 2015-16 पासून गोदाम भाड्याची रक्कम देण्यास शासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे यावर्षीसुद्धा खरेदी केलेले धान ठेवण्याची अडचण निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गोदाम मालक आर्थिक अडचणीत आले आहेत. वेळेवर धान साठवणुकीकरिता गोदामे नसल्याने खरेदी ठप्प पडते. मागील वर्षी गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात नव्या गोदामांचे बांधकाम करण्याची घोषणा झाली होती. परंतु, त्यात भंडारा जिल्ह्याचा समावेश नव्हता. 

साठवणुकीची समस्या 
हेक्‍टरी उत्पादन अधिक असलेल्या तालुक्‍यांत गोदामांची संख्या वाढविण्याची गरज आहे. परंतु, आतापर्यंत ही संख्या वाढलेली नाही. सहकारी भात गिरण्या, सेवा सहकारी संस्था व काही खासगी मालकीच्या गोदामावर अवलंबून राहावे लागते. धानाची आवक वाढल्यास या गोदामात धान ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसते. गोदामाअभावी नवीन माल ठेवण्यासाठी जागा नसल्याने धान खरेदी सुरू होण्यास विलंब लागतो. खरेदी विक्री संस्थेद्वारे सेवा सहकारी संस्था, बाजार समिती व काही खासगी गोदामाचा वापर धान ठेवण्यासाठी केला जातो. ठोकळ धानाचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे शासनाने धान खरेदी करण्याच्या यंत्रणेत वाढ करणे आवश्‍यक आहे. 

गोदाम उपलब्ध नसल्याने दरवर्षी धानखरेदीला त्रास होतो. 12 महिने साठवणूक करूनही केवळ दोन महिन्यांचे भाडे दिले जाते. त्यामुळे खासगी गोदाम मालक गोदाम भाड्याने देण्यास निरुत्साही आहेत. शासनाने जितके दिवस साठवणूक होईल; तितक्‍या दिवसांचे भाडे द्यावे.
-सदाशिव नारायण खेत्रे
उपाध्यक्ष, भंडारा-गोंदिया जिल्हा धानखरेदी संघटना.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com