"वरुड' हद्दपार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

कोरडवाहू, बागायती तसेच बहुवार्षिक फळपिकांचे दोन हेक्‍टरपेक्षा कमी व जास्त किती शेतकऱ्यांचे किती नुकसान झालेले आहे, याबाबतची माहिती या अहवालात नमूद करण्यात आलेली आहे.

अमरावती : जिल्ह्यात ऑक्‍टोबरमध्ये अवेळी पावसाने झालेल्या नुकसानाच्या मदतीतून वरुड तालुका पूर्णपणे हद्दपार झालेला आहे. सर्वेक्षणात नुकसानच समोर न आल्याने वरुड तालुक्‍याला मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे, तर मोर्शी तालुक्‍याला सर्वात कमी मदत मिळण्याची चिन्हे आहेत.
सप्टेंबरमध्ये पावसाळा संपल्यानंतर ऑक्‍टोबरच्या मध्यापासून जिल्ह्यात अवेळी पावसाने धुमाकूळ घालत सोयाबीन, तूर, कपाशी, मका, धान, उडीद या शेतीपिकांचे तसेच केळी, भाजीपाला, टरबूज आणि संत्रा फळपिकांचे नुकसान झाले. सरकारच्या 29 ऑक्‍टोबरच्या आदेशानुसार जिल्हाभरात महसूल, कृषी व ग्रामविकास विभागातर्फे संयुक्त सर्वेक्षणाला सुरुवात झाली. एसडीआरएफच्या निकषानुसार 33 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीपीक व बागायती तसेच फळपिकांची माहिती या सर्वेक्षणात घेण्यात आली.

वरुड तालुक्‍याचा अपवाद वगळता अवेळी पावसाचा जिल्ह्यात सर्वच तालुक्‍यांना फटका बसल्याचे या सर्वेक्षणातून समोर आलेले आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत महसूल उपसचिव तसेच कृषी आयुक्तांना पाठविण्यात आलेला आहे. कोरडवाहू, बागायती तसेच बहुवार्षिक फळपिकांचे दोन हेक्‍टरपेक्षा कमी व जास्त किती शेतकऱ्यांचे किती नुकसान झालेले आहे, याबाबतची माहिती या अहवालात नमूद करण्यात आलेली आहे.

एनडीआरएफ व एसडीआरएफच्या निकषांनुसार कोरडवाहू 6,800 रुपये, बागायती 13,500 रुपये व फळपिकांना 18 हजार रुपये (दोन हेक्‍टरच्या मर्यादेत) मदत दिली जाते. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार अमरावती तालुक्‍याला सर्वाधिक 29 कोटी 67 लाख 31 हजार रुपये तर सर्वात कमी मोर्शी तालुक्‍याला 6 कोटी 72 लाख 88 हजार रुपये मदत अपेक्षित आहे. 

तालुकानिहाय अपेक्षित मदत
अमरावती 29.67 कोटी, भातकुली 24.21 कोटी, तिवसा 10.79 कोटी, चांदूररेल्वे 15.44 कोटी,  धामणगावरेल्वे 23.88कोटी, नादंगावखंडेश्‍वर 25.42 कोटी, मोर्शी 6.72 कोटी, अचलपूर 20.33 कोटी, चांदूरबाजार 21.11 कोटी, दर्यापूर 24.14 कोटी, अंजनगावसुर्जी 22.40 कोटी, धारणी 15.07 कोटी, चिखलदरा 14.40 कोटी, वरुड निरंक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: warud Deportation