किमान पवार साहेबांची प्रतिष्ठा तर राखायची होती? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

- अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादीची डिपॉझिट जप्त 
- उमेदवारांना कार्यकर्त्यांचा प्रश्‍न 

अकोला : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यभर यश मिळत असताना अकोला जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार अमानत रक्कमही वाचू शकले नाहीत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राज्यभर यश मिळाले. अकोल्यातील उमेदवारांनी मात्र त्यांची प्रतिष्ठा घालवली. किमान पवार साहेबांची प्रतिष्ठा तरी राखला हवी होती, असा प्रश्‍न राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित करू लागले आहे. 
अकोला जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला बाळापूर आणि मुर्तीजापूर या दोन विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळाली होती. बाळापुर मध्ये तर खुद्द राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम दादा गावंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे, कॉंग्रेसच्या ताब्यातील मतदार संघ हा राष्ट्रवादीकडे आग्रहाने खेचून आणण्यात आला होता. मुर्तीजापुर मध्ये राष्ट्रवादीने रविकुमार राठी यांना उमेदवारी दिली होती. या दोन्ही उमेदवारांसाठी सुरुवातीच्या काळातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अतिशय व्यस्त कार्यक्रमातून वेळ देत सभा घेतली होती. या सभेला सर्व जाती-धर्माचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. दोन्ही मतदारसंघात पवार साहेबांनी यांच्या खास शैलीतील डावपेचही आपण दिले होते. मात्र त्यावर अंमलबजावणी करण्यात दोन्ही ठिकाणचे उमेदवार अपयशी ठरल्याने प्रत्यक्षात निकालांमध्ये अनुत्तीर्ण झाले. पवार साहेबांच्या सर्वांनी महाराष्ट्रातील राजकीय चित्र पालटून टाकले, त्याच साहेबांच्या दोन शिलेदारांना अकोला जिल्ह्यात अमानत रक्कमही वाचवता येऊ नये ही हि मोठी राजकीय शोकांतिका आहे. यात केवळ उमेदवारच दोषी आहेत असे नाही तर स्वतःला जिल्ह्यातील मोठे नेते म्हणणारे आणि राष्ट्रवादीचा झेंडा मिरवत राजकीय व्यासपीठांवरून मिरविणाऱ्या नेत्यांनाही या अपयशाचे तेवढेच वाटेकरी धरावे लागेल. भारतीय जनता पार्टीच्या लाटेत राज्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पन्नासच्या वर जागा जिंकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची राजकीय कोंडी केली. मात्र अकोल्यात दोन्ही उमेदवारांच्या अपयशाने त्यांच्या प्रतिष्ठेला व यशाला मोठा धक्का दिला. त्यामुळे राष्ट्रवादीचा खरा कार्यकर्ता आता या नेत्यांना दहा विचारू लागला आहे. किमान पवार साहेबांची प्रतिष्ठा राखली जाईल अशी कामगिरी करणारे उमेदवार दिले असते तर आज ही वेळ आली नसती. पवार साहेबांनी या उमेदवारांसाठी सभा घेतल्या नसत्या तर ते दोन्ही उमेदवार किती मतं स्वबळावर फिरवू शकले असते याची कल्पनाच करवत नसल्याचे कार्यकर्ते बोलू लागले आहेत. राज्यात राष्ट्रवादी पुन्हा आपले बळ वाढू लागली असताना जिल्ह्यातील कामगिरीने राष्ट्रवादीच्या अस्तित्वालाच धक्का दिला आहे. आता जिल्ह्यात राष्ट्रवादी पुन्हा उभारी घेईल यासाठी स्वतः पवार साहेबांनी लक्ष घालावे अशी मागणीही राष्ट्रवादीचे निष्ठावंत करीत आहेत. 
एकमेकांचे पाय ओढण्याची वृत्ती सोडा 
राष्ट्रवादी कॉंग्रेसची जिल्ह्यात वाताहात होण्यामागील सर्वात मोठी अडचण म्हणजे एकाही नेत्याचा एकमेकांशी पायपोस नसणे. कुणी पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याचे पायावरून मागे खेचणाऱ्यांची संख्याच या जिल्ह्यात अधिक आहे. ही वृत्ती जोपर्यंत नेते सोडत नाही तोपर्यंत या जिल्ह्यात राष्ट्रवादीला पायल होता येणार नाही हेच या निवडणुकीतून सिद्ध झाले आहे. 
ज्यांना पवार साहेब हे वाचू शकले नाही त्यांचा वाली कोण? 
अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर आणि बाळापुर या दोन मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसला विजयाची चांगली संधी होती. विद्यमान आमदारांच्या विरोधातील रोष, भाजप-शिवसेना यांच्यातील अंतर्गत मतभेद, या परिस्थितीचा फायदा घेता आला असता. पवार साहेबांच्या सभा नंतरही ज्यांना या पोषक वातावरणाचा लाभ उचलता आला नाही त्यांच्यासाठी आता कोण वाली आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
कॉंग्रेसची समन्वय साधण्यात अपयश 
बाळापुर हा मतदारसंघ मुळात कॉंग्रेसचा असल्यामुळे येथे राष्ट्रवादीला उमेदवारी मिळाल्यानंतर कॉंग्रेससोबत समन्वय साधून काम करण्याची गरज होती. मात्र हा समन्वय साधं यातच अपयश आल्याने राष्ट्रवादीला मोठ्या पळा भावास सामोरे जावे लागले असल्याचे तोंडी कॉंग्रेसकडून सांगितले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: was to be save prestige