देणार होते आठ हजार; मात्र जमा झाले चार-पाच हजार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 डिसेंबर 2019

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित राहत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

टुनकी (जि.बुलडाणा) : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक नुकसानीचा सर्व्हे करून दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी आठ हजार रुपये तर फळबागाकरिता हेक्टरी 18 हजार रुपयाची मदत दोन हेक्टरपर्यत लाभ देण्याचे जाहीर केले. मात्र, संग्रामपूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यात चार-पाच तर कुणाला सहा हजार असे जमा होत आहे.

राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या परतीचा पाऊसाने शेतकऱ्याच्या पिकांची नासाडी झाली. सोयाबीन, उळीद, मूग, कापूस, संत्रा, मका व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्यात पीक नुकसानीचा सर्व्हे करून दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी आठ हजार रुपये तर फळबागाकरिता हेक्टरी 18 हजार रुपयाची मदत दोन हेक्टरपर्यत लाभ देण्याचे जाहीर केले. ओल्या दुष्काळात बुलडाणा जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे मदतची पहिला टप्पा संग्रामपूर तालुक्याला 20 नोव्हेंबर रोजी 7 कोटी 62 लाख 4440 रुपये तहसील कार्यालयावर जमा झाला. 

हेही वाचा - अवघ्या 27 व्या वर्षीच बनला न्यायाधीश

Image result for शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

 

लाडणापूर भाग दोन मध्ये अपुरी मदत
तालुक्यातील 32 गावात ओला दुष्काळी निधी वितरीत करण्यात आला. त्यामध्ये लाडणापूर भाग दोन चा समावेश आहे. तब्बल महिना भरानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी चार ते पाच तर कोणाच्या खात्यात सहा हजार असे कमी जास्त पिकनिहाय रक्कम टाकण्यात आली. शासनाकडून सरसकट हेक्टरी आठ हजार रुपयाची मदत जाहीर केल्यानंतर फक्त लाडणापूर भाग दोन च्या शेतकऱ्याच्या खात्यात अपुरी मदत टाकण्यात आलेली आहे. 

क्लिक करा - शेतकऱ्याने कुटुंब काढले विक्रीला

सर्व्हे करणाऱ्या कर्मचाऱ्याची चुकी
शासनाकडून आधिच अपुरी मदत शेतकऱ्यांना मिळते, त्यात लाडणापूर भाग दोन चा सर्व्हे करणाऱ्याला कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. तहसील कार्यालयात याबद्दल माहिती घेतली असता सर्व्हे करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या यादीनुसार शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा केल्याचे सांगत आहेत. जिल्हाधिकारी यांनी यांची दखल घेवून शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली सरसकट मदत मिळवून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

हेही वाचा - अकोल्याचा दर्शन आयपीएलमध्ये झळकणार

तर पुन्हा याद्या मागवून मदत
लाडणापूर भाग दोनच्या शेतकऱ्यांना यादी प्रमाणे मदत देण्यात आली आहे. मात्र, मदत ही सरसकट हेक्टरी आठ हजार रुपयाप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत आहे. जर शेतकऱ्यांना अपुरी मदत मिळाली तर पुन्हा याद्या मागवून मदत वितरीत केल्या जाणार आहे.
-मुकुंदे, तहसीलदार, संग्रामपूर

एक हेक्टरच्यावर शेत असताना मिळाले आठ हजार
माझ्या नावाने लाडणापूर भाग दोन मध्ये चार एकर वीस गुंठे शेत असून, माझ्या खात्यात फक्त आठ हजार रुपये ओल्या दुष्काळीची मदत जमा झालेली आहे. 
-नंदा बोदळे, महिला शेतकरी, लाडणापूर.

अन् मिळाले पाच हजार
माझ्या नावाने लाडणापूर भाग दोन मध्ये एक हेक्टर शेती आहे. मला ओला दुष्काळी मदत पाच हजार 600 रुपये खात्यात जमा झाले.
-रामा कोष्ठी, शेतकरी, टुनकी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Was to give eight thousand; But the accumulated four-five thousand