महापौर, अतिरिक्त आयुक्तांपुढे पाण्याची नासाडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

शहरावर पाण्याचे संकट असताना रविवारी अग्निशमन विभागाच्या जवानांनी प्रात्यक्षिकासाठी हजारो लिटर पाण्याची उधळण केली. विशेष म्हणजे महापौर नंदा जिचकार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या उपस्थितीतच पाण्याची नासाडी करण्यात आली.

नागपूर - शहरावर पाण्याचे संकट असताना रविवारी अग्निशमन विभागाच्या जवानांनी प्रात्यक्षिकासाठी हजारो लिटर पाण्याची उधळण केली. विशेष म्हणजे महापौर नंदा जिचकार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या उपस्थितीतच पाण्याची नासाडी करण्यात आली. त्यामुळे पाणी बचतीबाबत महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या गांभीर्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाने रविवारी अग्निशमन सेवा दिनानिमित्त सिव्हिल लाइन्स येथील मुख्यालय परिसरात चित्तथरारक प्रात्यक्षिक केले. यावेळी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, अग्निशमन सेवा समितीचे सभापती लहुकुमार बेहते, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अग्निशमन सेवा समितीचे सदस्य निशांत गांधी, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, सहायक आयुक्त विजय हुमणे, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके असे सारेच उपस्थित होते. अग्निशमन विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध केंद्रांच्या चमूने प्रात्यक्षिक सादर केलेत.

 आग लागल्यानंतर अग्निशमन विभागातर्फे कशा पद्धतीने आग विझविण्यात येते. विविध प्रकारच्या आगीवर कसे नियंत्रण मिळवावे आदींचे प्रात्यक्षिक सादर करीत असताना हजारो लिटर पाण्याची उधळण करण्यात आली. विशेष म्हणजे अनेकदा पाणी बचतीचे आवाहन करणाऱ्या महापौर नंदा जिचकार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे हे प्रमुख अधिकारी व पदाधिकारीही उपस्थित होते.

अनेकांच्या भुवया उंचावल्या
अग्निशमन विभागाला आगीदरम्यान जखमी झालेल्यांना स्ट्रेचरवरून उपचारासाठी नेणे, धुराने गुदमरलेल्या रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचेही प्रात्यक्षिक करता आले असते. अनेकदा ही प्रात्यक्षिके मॉक ड्रिलदरम्यान करण्यात येतात. ही प्रात्यक्षिक करून पाण्याची बचत टाळणे शक्‍य होते. परंतु, पाण्याची नासाडी करीत प्रात्यक्षिक करण्यात आले. महापौर, अतिरिक्त आयुक्तांनी बघ्याची भूमिका घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Web Title: Waste of water infront of Mayor Additional Commissioner