चौकीदाराला कोंडून बॅंकेला लावले टाळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

वरोरा -चलनातून रद्द झालेल्या पाचशे-हजारच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी राष्ट्रीयीकृत बॅंकांना केंद्र सरकारने दिली. मात्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना वगळण्यात आले. यामुळे गेल्या काही दिवसांपासून या बॅंकेशी संलग्नित खातेदारांचे व्यवहार ठप्प पडले आहेत. रब्बी हंगामाच्या तोंडावर पैसे मिळत नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी माढेळी येथे जिल्हा बॅंकेच्या दाराला टाळे ठोकले. अधिकारी, कर्मचाऱ्यांना बॅंकेत शिरकाव करण्यास मज्जाव करण्यात आला. चौकीदारास चार तास बॅंकेतच कोंडून ठेवले.

माढेळी येथे जिल्हा बॅंकेची शाखा आहे. सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयापासून या बॅंकेतील व्यवहार ठप्प पडले आहेत. या बॅंकेत अद्याप दोन हजारांच्या नोटा आलेल्या नाहीत. पाचशे, शंभर रुपयांच्या नोटाही मिळणे कठीण झाले. गेल्या आठ दिवसांपासून खातेदारांना स्वतःच्या खात्यात जमा असलेली रक्कमही काढता आली नाही. बॅंकेच्या या कारभारामुळे शेतकरी वैतागले आहेत.
बॅंकेत आज सकाळी शेकडो शेतकरी आले. साफसफाईसाठी चौकीदार आत गेला. त्यानंतर खातेदारांनी बॅंकेचा दरवाजा बंद करून त्याला कुलूप ठोकले. बॅंक व्यवस्थापक वरारकर व कर्मचाऱ्यांना बॅंकेत प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला. रक्कम येईपर्यंत बॅंकेत प्रवेश करू देणार नसल्याची भूमिका खातेदारांनी घेतली होती. अखेर वरारकर यांनी मुख्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर दीड वाजता मुख्य शाखेतून रक्‍कम आली. त्यानंतर शेतकऱ्यांनी बॅंकेचा दरवाजा उघडला आणि बॅंकेचे आर्थिक व्यवहार सुरू झाले.

Web Title: Watchman shut Bank lock