पाणी बिल आता ग्राहकांच्या ई-मेलवर

पाणी बिल आता ग्राहकांच्या ई-मेलवर

नागपूर : इंटरनेट वापरणाऱ्या शहरातील ग्राहकांसाठी ओसीडब्ल्यू व महापालिकेने आता ई-मेलवर पाण्याचे बिल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शहरातील जवळपास 50 हजारांवर नागरिकांनी ई-मेलवर पाणी बिलाची मागणी केली होती. एवढेच नव्हे नागरिकांसाठी "कन्झ्युमर सेल्फ सर्व्हिस पोर्टल'ही सुरू करण्यात आले असून नागरिकांना येथे तक्रार करता येणार आहे. 
शहरवासींनी विविध सुविधा देण्यात आघाडीवर असलेल्या महापालिका व ओसीडब्ल्यूने आता पाण्याची बिले ई-मेलवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ओसीडब्ल्यूने यापूर्वी डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली होती. 50 हजारांवर ग्राहक डिजिटल पेमेंट करीत आहेत. त्यांनी पाण्याची बिले ई-मेल मिळावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे आता पाण्याची बिले त्यांच्या ई-मेलवर पाठविण्यात येणार आहे. याशिवाय सर्वच 3 लाखांवर ग्राहकांना ई-मेलवर बिले पाठविण्यात येणार आहे. यासाठी ग्राहकांना आपला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक www.ocwindia.com या संकेतस्थळावरील "कन्झ्युमर कॉर्नर'वर नोंदवावा लागणार आहे. याशिवाय ओसीडब्ल्यू-महापालिकेने ग्राहकांसाठी कन्झ्युमर सेल्फ सर्व्हिस पोर्टलही सुरू केले. यावर नागरिकांना त्यांच्या पाण्याच्या बिलासंदर्भात सर्व माहिती मिळणार आहे. पाण्याबाबत तक्रार नोंदवून त्याची अद्ययावत स्थिती अर्थात त्यावर काय निर्णय झाला? याबाबतही माहिती घेणे शक्‍य होणार आहे. ग्राहकांना या पोर्टलवर ऑनलाइन पाणी बिल अदा करणे तसेच पीडीएफ स्वरूपात पावतीही डाउनलोड करणे शक्‍य होणार आहे. या पोर्टलवर शेवटच्या सहा महिन्यांच्या बिलाचे रेकॉर्ड उपलब्ध राहणार आहे. पोर्टल केवळ वैध ग्राहकांसाठी असून नोंदणी प्रक्रियेसाठी ओटीपी क्रमांकाचा वापर करावा लागणार आहे. नोंदणीसाठी www.ocwindia.com या संकेतस्थळवरील "कन्झ्युमर कॉर्नर'ला भेट द्यावी लागणार आहे. आज या सेवेचे ओसीडब्ल्यूचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय रॉय यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यावेळी ओसीडब्ल्यूचे संचालक के. एम. पी. सिंह, राजेश कालरा, वरिष्ठ अधिकारी विनोद गुप्ता, मलोय चौधरी, प्रवीण शरण व ग्राहक सेवा विभागाचे मोहमद अयाझ, अमोल पांडे उपस्थित होते. 
पाणी बिल भरण्यासाठी विविध पर्याय 
"नागपूर वॉटर' हे ऍपदेखील सेवेत उपलब्ध केले असून ग्राहकांना पाणी बिल भरण्यासाठी "पेटीएम'चाही वापर करता येणार आहे. या व्यवहाराची पावती ग्राहकांना पेटीएमद्वारेच मिळणार आहे. पेटीएमद्वारे भरलेली रक्कम नागरिकांच्या खात्यामध्ये 24 तासांत दिसणार आहे. कॅशलेस व्यवहारांसाठी मनपा-ओसीडब्ल्यूने यापूर्वीच दहाही झोनमध्ये स्वाईप मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्राहकांना व्हिसा किंवा मास्टरकार्डच्या साहाय्याने पाणी बिल भरणे शक्‍य आहे. 
जलकुंभावरही तक्रार करण्याची सुविधा 
झोन कार्यालयांमधील ग्राहक सेवा केंद्रांशिवाय विविध झोनमध्ये अतिरिक्त देयक स्वीकृती केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्रिमूर्तीनगर जलकुंभ (लक्ष्मीनगर झोन), दाभा जलकुंभ (धरमपेठ झोन), खरबी जलकुंभ (नेहरूनगर झोन), शांतीनगर जलकुंभ (सतरंजीपुरा झोन) व सुभाननगर जलकुंभ (लकडगंज झोन) या ठिकाणी ग्राहकांना पाणी बिल अदा करता येणार आहे. शिवाय पाणीपुरवठ्याबाबत तक्रार करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com