सांगा, किती बोअरवेलमधून मिळतयं पाणी?

ZP-Nagpur
ZP-Nagpur

नागपूर - जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई आहे. नागरिकांना दोन-दोन किलोमीटर लांबून पाणी आणावे लागत आहे. मात्र, अद्याप टंचाईची निम्मीही कामे झाली नाही. जिल्ह्यात बोअरवेल झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, बोअरवेलवर ‘हॅंड पंप’चे यंत्र बसविण्यात आले नसल्याने लोकांना फायदा होत नसल्याचा आरोप करीत तुम्हीच सांगा, किती  बोअरवेलमधून नागरिकांना पाणी मिळत आहे, असा सवाल विरोधी पक्षातील सदस्यांनी केला. सभागृहात सत्तापक्षाकडून व अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात येत होती. टंचाईच्या कामावरून विरोधकांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. याला सत्ताधारी पक्षातील काही सदस्यांनाही जोड दिली. 

आज सोमवारची जि. प.ची सर्वसाधारण सभा पाणी प्रश्‍नावर चांगलीच वादळी ठरली. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनी सभेच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचा प्रश्‍न उपस्थित केला. ते म्हणाले, जिल्ह्याला तीन टप्प्यामध्ये ६२५ वर बोअरवेल मंजूर आहेत. आज निम्मा उन्हाळा संपुष्टात आल्यानंतरही जिल्ह्यात मंजूर बोअरवेलपेक्षा निम्म्याही बोअरवेलची कामे पूर्ण झाली नाहीत. केवळ १५१ इतक्‍याच बोअरवेलची कामे पूर्ण झाली आहेत.

तर यातील बोटावर मोजण्याइतपतच बोअरवेलला हॅण्डपंप बसविण्यात आले आहे. या बोअरवेलच्या पाण्याचा नाममात्र नागरिकांनाच फायदा होत असल्याचे वास्तव आहे. अध्यक्षांनी भीषण टंचाई लक्षात घेता टंचाईच्या काळात एकही आढावा सभा घेतली नाही. किंवा टंचाईग्रस्त गावे, तालुक्‍यांना अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी भेटी घेऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. यावर ग्रामीण  पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख टाकळीकर यांनी करण्यात आलेल्या कामाची माहिती दिली. ३१ गावात ३८ टॅंकरने पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले. मात्र, सदस्यांच्या प्रश्‍नावर टोलवाटोलवीचे उत्तर दिले. 

सदस्य चंद्रशेखर चिखले म्हणाले की, जिल्ह्यातील काटोल, नरखेड व कळमेश्वर या दुष्काळग्रस्त गावातील नागरिकांचा पाण्याअभावी आटापिटा सुरू आहे. मात्र, या भीषण दुष्काळग्रस्त तालुक्‍यांतील गावांमध्ये एकाही गावात प्रशासनाकडून  टॅंकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू नाही. 
टंचाईच्या दृष्टिकोनातून जि. प. प्रशासनाने  करावयाची उपाययोजना ही आज करण्यापेक्षा पूर्वीच का केली नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बोअरवेलचे खड्‌डे खोदले, मात्र त्याला पंपच लावण्यात आले नसल्याने ते कुचकामी ठरत असल्याचा मुद्दा भारती गोडबोले यांनी मांडला. अधिकाऱ्यांनी सदस्यांच्या  प्रश्‍नावर उडवाउडवीचे उत्तर दिले.  

कुही, भिवापूर, रामटेकमध्ये एकही बोअरवेल नसल्याचे समोर आले. चर्चेत वंदना पाल, मनोज तितरमारे, उज्ज्वला बोढारे, नंदा नारनवरे, सुरेंद्र शेंडे, नाना कंभाले, वंदना पाल, शांता कुमरे, नंदा लोहबरे, छाया ढोले, बबिता साठवणे आदी सदस्यांनी भाग घेतला.

अध्यक्ष निष्क्रिय आहेत. त्यांनी वेळीच बैठका घेऊन अधिकाऱ्यांना कामावर लावले नाही. अधिकाऱ्यांवर त्यांचा वचक नाही. टंचाईसाठी तेच जबाबदार आहेत.
- मनोहर कुंभारे, विरोधी पक्षनेते.

टंचाई निवारणासाठी योग्य कार्यवाही करण्यात येत आहे. सर्वाधिक बोअरवेल जिल्ह्यात होत आहेत. दहा दिवसांनी पुन्हा टंचाईचा आढावा घेण्यात येईल. 
- निशा सावरकर, अध्यक्ष, जि. प.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com