शहराला दिवसाआड पाणी

file photo
file photo

नागपूर, ता. 15 ः उन्हाळ्यात दोन वेळ पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेने ऐन पावसाळ्यात शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. उन्हाळ्यात पाण्याच्या नियोजनाची आवश्‍यक असताना त्याकडे गांभीर्याने न बघितल्याने महापालिकेवर ही नामुष्की ओढवल्याची चर्चा यानिमित्त सुरू झाली. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होणार असून येत्या बुधवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा बंद असलेल्या दिवशी टॅंकरनेही पाणी मिळणार नाही. त्यामुळे जलवाहिन्यांचे जाळे असलेल्या तसेच शहर सीमेवरील टॅंकरवर अवलंबून असलेल्या नागपूरकरांना दोन दिवसांचा पाणीसाठा करावा लागणार आहे. नागरिकांना टंचाईची झळ पोहोचू न देता उन्हाळ्यात दोनवेळ पाणीपुरवठा करण्यात आला. परंतु, पावसाने पाठ फिरविल्याने शहराला पाणीपुरवठा करणारे जलसाठे कोरडे झाले आहे. त्यामुळे दुर्दैवाने एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सत्तापक्षनेते संदीप जोशी, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. हा निर्णय सध्या सुरू आठवड्यासाठी आहे. परंतु, पाऊस न आल्यास निर्णयावर पुनर्विचारासाठी सोमवारी पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नवेगाव खैरी येथून कन्हान नदीत पाणी सोडले जात होते. परंतु, नवेगाव खैरी जलाशयही आटले असून गेल्या 20 दिवसांपासून येथून पाणी सोडणे बंद करण्यात आले. या पावसाळ्यात आजपर्यंत नवेगाव खैरी जलाशय परिसरात केवळ 172 मिलिमीटर पाऊस पडला. मागील वर्षी 15 जुलैपर्यंत 536 मिलिमीटर पाऊस पडला होता. याशिवाय तोतलाडोह जलाशय परिसरात केवळ 158 मिलिमीटर पाऊस झाला. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यंत 394 मिलिमीटर पाऊस पडला होता. पावसाने दगा दिल्याने शहरावर दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. परंतु, उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन करण्याची गरज असताना शहराला दोनवेळ पाणी देण्यात आले. उन्हाळ्यात योग्य नियोजन झाले असते तर शहरावर पावसाळ्यात पाणी कपातीची नामुष्की ओढवली नसती, अशी दबक्‍या आवाजात नगरसेवकांत चर्चा सुरू झाली आहे. पत्रकार परिषदेला उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, प्रतोद दिव्या धुरडे, अतिरिक्‍त आयुक्त राम जोशी, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्‍वेता बॅनर्जी आदी उपस्थित होते.गोरेवाडा तलावाची पातळी 311.57, नवेगाव खैरी जलाशयाची पातळी 318.36, तोतलाडोहची पातळी 460 मीटरपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून बुधवार, शुक्रवार, रविवारी पाणीपुरवठा केला जाणार नाही.कन्हान नदीतून नेहरूनगर, लकडगंज, सतरंजीपुरा, आशीनगर झोनमधील वस्त्यांना पाणीपुरवठा होतो. कन्हान नदीतून पाणी न घेतल्यास वाहून जाईल. त्यामुळे कन्हान नदीतील पाण्याचा या चारही झोनला दररोज पुरवठा केला जाईल, असे पिंटू झलके यांनी स्पष्ट केले.शहरात दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना माहिती देण्यात आल्याचे सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी नमूद केले.या निर्णयाबाबत सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षला काहीही कळविले नाही, असे नमुद करीत विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी टिका केली. उन्हाळ्यात पाण्याचे योग्य नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने आज ही नामुष्की ओढवल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com