‘सेव्ह वॉटर’ लघुपटातून जलसंवर्धनाचा संदेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

उच्चप्रतीच्या दृकश्राव्य माध्यमाचा वापर करून तयार होत असलेल्या या लघुपटाला विविध सामाजिक संघटना आणि संस्थेच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हा लघुपट प्रदर्शित करण्याचा निर्धार आहे.
- प्रेम धीराल, दिग्दर्शक.

नागपूर - जागतिक तापमानवाढीमुळे पाण्याची पातळी दिवसागणिक कमी होत आहे.  घटत चाललेले पर्जन्यमान जगासाठीच काळजीचा विषय ठरला आहे. पाण्याच्या अभावातून  निर्माण होऊ घातलेली अराजकता टाळण्यासाठी जलसंवर्धन करणे आवश्‍यक झाले आहे. जलसंवर्धनासारख्या महत्त्वपूर्ण विषयावर ‘सेव्ह वॉटर’ लघुपटाची नागपुरातील दिग्दर्शक प्रेम धीराल निर्मिती करीत आहेत.

‘सेव्ह द वॉटर’ लघुपट म्हणजे जंगलात अडकलेल्या परिवाराची गोष्ट आहे. प्रचंड संघर्षातून बाहेर आल्यावर त्या परिवारातील मोठ्या मुलाच्या मनात पाण्यासंबंधी संवेदना जागृत होतात. तो जलसंवर्धनासाठी लोकजागृतीच्या हेतूने मोहीम हाती घेतो आणि त्यातूनच समाजाला पाण्याचे महत्त्व पटवून देतो. जलसमस्येचा स्थानिक पातळीपासून, तर वैश्विक स्तरापर्यंतचा  मागोवा जगापुढे आणण्याचा प्रयत्न या कथानकातून करण्यात आला आहे. उत्तम दर्जाच्या कॅमेऱ्यातून होणारे चित्रीकरण, ड्रोन कॅमेरा व अन्य व्हिज्युअल इफेक्‍ट्‌सच्या माध्यमातून पाण्याचे भीषण वास्तव प्रकट करण्याचा मानस धीराल यांनी व्यक्त केला.

यू-ट्यूब, व्हॉट्‌सॲप व फेसबुक आदी माध्यमातूनही हा लघुपट मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येणार आहे. प्रेम धीराल हे धीराल एंटरटेनमेंटचे युवा संचालक असून, त्यांनी संस्थेद्वारे सामाजिक भावनेतून विविध प्रकल्प आजवर राबविले आहेत. भिकाऱ्यांच्या ज्वलंत समस्यांवरील लघुपट त्यापैकीच एक आहे.

Web Title: Water conservation message from 'Save Water' short film