जलसत्याग्रह आंदोलकांचे अन्नत्याग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

वेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, रात्रभर नदीच्या पाण्यात बसून असल्याने चार महिला आंदोलकांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी वेलतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

महिलांची प्रकृती बिघडल्यानंतर प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली. शुक्रवारी कुहीचे नायब तहसीलदार पांगोळे यांनी उमरेडचे उपविभागीय अधिकारी जे. पी. लोढे यांना पत्र लिहून आंदोलकांच्या भूमिकेविषयी माहिती दिली. यानंतर चार वाजता उमरेड उपविभागीय अधिकारी कार्यालयात आमदार सुधीर पारवे यांच्यासह आंदोलकांची बैठक झाली. यात गोसेखुर्द प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विजयश्री बुराडे, सहायक अभियंता शिखा तुपलेवार, जिल्हा पुर्नवसन अधिकारी अविनाश कातडे, तहसीलदार प्रमोद कदम उपस्थित होते.
या बैठकीत आंदोलकांनी गोसेखुर्द प्रकल्प अधिकारी व पुनर्वसन अधिकाऱ्यांकडून गैरप्रकार झाल्याचा आरोप केला. या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला. गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या अन्नत्याग आंदोलनानंतर चार आंदोलनकर्त्या महिलांची शुक्रवारी दुपारी तब्बेत बिघडल्याने त्यांच्यावर आंदोलनस्थळी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी वेलतूरच्या प्राथमिक आरोग्य केन्द्रात भरती करण्यात आले आहे. यात शांता गोल्हर (वय 55), सुलोचना गायकवाड (वय 60), सयजा चोपकर (वय 55) आणि सखू कारेमोरे (वय 62) यांचा समावेश आहे. आंदोलनकर्त्यांनी आधी उपचार करून घेण्यास नकार दिला होता. टेकेपारवासींच्या आंदोलनाला अन्य गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त गावांमधून पाठिंबा मिळू लागला आहे.

आंदोलकांचे हित साधले जात नाही तोवर लढा देईल. पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत मुद्दा उपस्थित करून तोडगा काढू. आंदोलकांसोबत मंत्रालयात चर्चा करण्यात येईल.
- सुधीर पारवे, आमदार, उमरेड

Web Title: Water conservation protesters news