कुलरमध्ये पाणीच पाणी, वॉटर कुलर रिकामे  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) पाण्याची समस्या दूर करण्यासाठी एटीएम लावण्यात आले खरे, परंतु बाह्यरुग्ण विभागासह इतरही अनेक विभागांतील वॉटर कुलरमध्ये पाणी नसल्यामुळे शेकडो रुग्णांच्या नातेवाइकांची पाण्यासाठी धावाधाव सुरूच आहे. 

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) पाण्याची समस्या दूर करण्यासाठी एटीएम लावण्यात आले खरे, परंतु बाह्यरुग्ण विभागासह इतरही अनेक विभागांतील वॉटर कुलरमध्ये पाणी नसल्यामुळे शेकडो रुग्णांच्या नातेवाइकांची पाण्यासाठी धावाधाव सुरूच आहे. 

बाह्यरुग्ण विभागातील वॉटर कुलर बंद असल्याने सकाळपासून तर दुपारी २ वाजतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक रुग्णांच्या नातेवाइकांची पाण्याच्या एटीएमकडे धाव असते. परंतु येथे प्रचंड गर्दी असते. विशेष असे की, येथील सुरक्षा क्‍लिनिकसह इतरही विभागातील कुलरच्या टाकीत पाणीच पाणी असते. परंतु वॉटर कूलर रिकामे आहेत.

मेडिकलकडून पाणीपट्टी म्हणून दरमहा पाण्यासाठी सुमारे २० लाखांपेक्षा अधिक रुपये भरण्यात येतात. मात्र तरीदेखील पाण्याचे वॉटर कुलर रिकामे आहे. मागील ८ दिवसांपासून मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागातील लिफ्टजवळ असलेल्या पाण्याचे नळ कोरडे पडले आहेत. याशिवाय मेडिकलच्या औषधालयातील वॉटर कुलरमध्ये पाणी नसल्यामुळे एक बादली पाणी येथे भरून ठेवण्यात येते. विशेष असे की, विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातही पाण्याचा थेंबही मिळत नसल्यामुळे वसतिगृह अधीक्षकांकडे तक्रार करण्यापलीकडे काही करता येत नाही. 

मेडिकलच्या देखभालीची, पाणीवितरण प्रणालीची व्यवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. परंतु, पाणी वितरण प्रणाली योग्यरीत्या हाताळण्यात येत नसल्यामुळे पाणी समस्या निर्माण होत असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी निवासी डॉक्‍टरांनीही पाण्यासाठी अधिष्ठाता कार्यालयावर मोर्चा नेला होता. मेडिकलमध्ये पाण्याच्या दोन टाक्‍या आहेत. टाकी दुरुस्त करण्याचा प्रकल्प तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी सादर केला होता. याशिवाय नळाच्या पाण्याची समस्या असल्यामुळे विहीर खोदण्याचाही प्रस्ताव वैद्यकीय संचालक कार्यालयासमोर सादर केला होता. याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. यामुळेच ही समस्या निर्माण झाली आहे. पाणी साठवण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेली टाकी पुरेशी नाही. दंत महाविद्यालयालाही याच टाकीवरून पाणीपुरवठा होतो.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water in the cooler but Water cooler empty