हिंगणा तालुक्‍यात जलसंकट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

हिंगणा (जि.नागपूर): : पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटत असतानाही तालुक्‍यातील आठ तलावांत फक्‍त 25 टक्‍के पाणीसाठा आहे. सध्या सुरू असलेला पाऊस शेती हंगामाला पोषक आहे. वेणा व कृष्णा नद्या अद्याप तहानलेल्याच आहेत.

हिंगणा (जि.नागपूर): : पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटत असतानाही तालुक्‍यातील आठ तलावांत फक्‍त 25 टक्‍के पाणीसाठा आहे. सध्या सुरू असलेला पाऊस शेती हंगामाला पोषक आहे. वेणा व कृष्णा नद्या अद्याप तहानलेल्याच आहेत.
हिंगणा तालुक्‍यात जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे 13 तलाव आहेत. पाटबंधारे विभागाचे चार मोठे तलाव आहेत. यावर्षी पावसाळा सुरू झाला; मात्र रिमझिम पावसानेच जमिनीत मुरेल असा पाऊस झाला. शेती हंगामाला पोषक असा पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.  जोरदार पाऊस न झाल्यामुळे तालुक्‍यातील तलावात मुबलक पाणीसाठा अद्याप होऊ शकला नाही. जिल्हा परिषद लघुसिंचन तलावांपैकी कालडोंगरी व उमरी वाघ तलावाने पूर्णपणे साठवणक्षमता गाठली आहे. उर्वरित सातनवरीमधील चार तलाव 10 टक्‍के, येरणगाव 52 टक्‍के, वलनी 53 टक्‍के, चिचोली पठार 56 टक्‍के, मांडवा महार 80 टक्‍के, पोही 80 टक्‍के जलसाठा उपलब्ध आहे. राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या बीडबोरगाव, कान्होलीबारा तलावातही 30 टक्‍के जलसाठा उपलब्ध आहे. हिंगणा तालुक्‍यातील वेणा व कृष्णा या दोन नद्या जनतेची तहान भागवतात. यावर्षी अद्याप या नद्या दुथडी भरून वाहिलेल्या नाहीत. तुरळक प्रमाणात पाणीसाठा नद्यांमध्ये दिसून येत आहे. हिंगणा तालुक्‍यात पावसाळ्याच्या हंगामात 55 दिवस पाऊस पडतो. पावसाची सरासरी 1100 मिमी आहे. या वर्षी मात्र सद्यःस्थितीत केवळ 40 टक्‍के पाऊस पडला आहे. उर्वरित 60 टक्‍के पाऊस पडणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. पावसाचा जोर वाढला नाही तर तलावांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध होणार नाही, तसेच नद्याही दुथडी भरून वाहणार नाहीत. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास हिंगणा तालुक्‍यावर जलसंकट ओढावण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

मंडळनिहाय पावसाची आकडेवारी
1) हिंगणा 228.7
2) कान्होलीबारा 412.8
3) वानाडोंगरी 528.7
4) गुमगाव 522.2
5) आडेगाव 393.2
6) टाकळघाट 500.3
एकूण 2848.4 मिमी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water crisis in Hingana taluka