ऊर्जा प्रकल्पाचे पाणी शहरवासींना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

नागपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये निम्माही पाणीसाठा नसल्याने शहरावर जानेवारीपासूनच पाणीटंचाईचे संकट आहे. उन्हाळ्यात शहराची तहान कशी भागविणार? यावर अद्याप प्रशासनाला उत्तर सापडले नाही. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज कोराडी, खापरखेडा ऊर्जा प्रकल्पासाठी पेंचमधील आरक्षित पाणी न घेता शहराला द्यावे, अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केली.

नागपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये निम्माही पाणीसाठा नसल्याने शहरावर जानेवारीपासूनच पाणीटंचाईचे संकट आहे. उन्हाळ्यात शहराची तहान कशी भागविणार? यावर अद्याप प्रशासनाला उत्तर सापडले नाही. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज कोराडी, खापरखेडा ऊर्जा प्रकल्पासाठी पेंचमधील आरक्षित पाणी न घेता शहराला द्यावे, अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केली.
शहराला पाणीपुरवठा करणारा पेंच व नवेगाव खैरी येथील धरणात सातत्याने पाणीपातळी खालावत आहे. याशिवाय यंदा परतीच्या पावसानेही दगा दिला. पेंच धरणात आजच्या स्थितीत फक्‍त 13.19 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला पेंचमध्ये 30.67 टक्के पाणी होते. यावरून यंदा नागपूरकरांपुढे तीव्र जलसंकट दिसून येते. नवेगाव खैरी येथे आज 40.06 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षीपेक्षा दोन टक्‍क्‍यांनी हा पाणीसाठा अधिक असला तरी यातील पाणी नागपूरला दिले जात असून सातत्याने यात घट होत आहे. सध्या या जलाशयात जानेवारीपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे महापालिकेनेही कूपनलिका खोदणे, विहिरींची दुरुस्ती आदी कामे सुरू केली. एवढेच नव्हे, जानेवारीपासून कपातीचे संकेतही दिले आहेत. परंतु, उन्हाळ्यात शहरावर मोठ्या पाणीटंचाईचे सावट बघता मार्च, एप्रिल व मे महिन्यात कोराडी व खापरखेडा ऊर्जा प्रकल्पाचे पेंचमधील आरक्षित पाणी शहराला द्यावे, अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज "ऍग्रोव्हिजन'च्या पत्रकार परिषेदत बोलताना सांगितले.
महापालिकेचे सांडपाणी प्रक्रिया करून या ऊर्जा प्रकल्पांसाठी वापरण्यात येत आहे. यात वाढ करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईचे नागपूरकरांचे चटके काही प्रमाणात कमी होण्याची शक्‍यता आहे. परंतु, नागपूरकरांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
मानवी चुकांमुळेही दुष्काळ
दुष्काळ नैसर्गिक संकट आहेच; परंतु काही मानवी चुकांचाही परिणाम आहे. यापूर्वी अनेक तज्ज्ञांनी दुष्काळाचे भाकित करीत त्यातून सावरण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले. परंतु, कुणीही ते गांभीर्याने घेतले नाही, असे केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले. मात्र, आता सरकारसह सारेच याबाबत गंभीर झाले असून, जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जेथे चेक डॅम तयार झाले, तेथे आजही विहिरी पाण्याने तुडुंब असल्याचेही ते म्हणाले.

 

 

 

Web Title: water crisis news in nagpur