विदर्भ तहानलेलाच

File photo
File photo

नागपूर :  हवामान विभागाने यंदा चांगल्या मॉन्सूनचा वर्तविलेला अंदाज पूर्णपणे खोटा ठरला आहे. विदर्भातील अकरापैकी केवळ तीनच जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला. सर्वाधिक चिंताजनक स्थिती बुलडाणा जिल्ह्याची आहे. पावसाळा संपल्यामुळे येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या जाणवण्याची शक्‍यता आहे.
गतवर्षी मॉन्सूनने काहीशी निराशा केल्यानंतर हवामान विभागाने यंदा दमदार पावसाची शक्‍यता वर्तवून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या होत्या. परंतु, प्रत्यक्षात तो अंदाज फोल ठरला. यावर्षी सरासरी पावसाच्या आठ टक्‍के (70 मिलिमीटर) कमी पावसाची नोंद करण्यात आली. विदर्भात 1 जून ते 30 सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये सरासरी 955 मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र प्रत्यक्षात 875 मिलिमीटर पावसाचीच नोंद झाली. हवामान विभागाने मात्र हा सरासरीइतकाच पाऊस असल्याचे म्हटले आहे.
विदर्भात केवळ अकोला, वाशीम आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांमध्येच पावसाने सरासरी ओलांडली. अन्य जिल्हे अजूनही तहानलेले आहेत. सर्वाधिक चिंताजनक स्थिती बुलडाणा जिल्ह्याची आहे. येथे सरासरी साडेसहाशे मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा हा आकडा 30 टक्‍क्‍यांनी घसरून 472 मिलिमीटरवर आला. त्यामुळे आगामी उन्हाळा बुलडाणावासींसाठी नक्‍कीच अग्निपरीक्षेचा काळ राहणार आहे. मॉन्सून परतीच्या मार्गाने लागल्याने आता विदर्भात पावसाची शक्‍यता कमीच आहे. केरळमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. परंतु त्याचा प्रभाव विदर्भात जाणवणार नसल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
धरणांमध्ये केवळ 46 टक्‍के पाणी
कमी पावसामुळे नागपूर विभागातील धरणांची पाणीसाठा स्थिती नाजूक आहे. जलाशयांमध्ये 46 टक्‍केच पाणी शिल्लक आहे. अर्धे रिकामे असल्यामुळे भविष्यात विदर्भात विशेषत: पूर्व विभागात भीषण दुष्काळाचा धोका निर्माण झाला आहे. विहिरींची पातळी खोल गेल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीलाही पाणी मिळण्याची शक्‍यता कमी आहे. याचा सर्वाधिक फटका रब्बी पिकांना बसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com