गरज १३५ लिटरची, उधळण अडीचशे लिटरची

Water
Water

नागपूर - यंदा जलाशये कोरडी पडल्याने शहरावर जलसंकट घोंगावत आहे. महापालिकेनेही कधी नव्हे ते शहरातील विहिरी स्वच्छता व बोअरवेल दुरुस्तीकडे धाव घेतली. मात्र, पाण्याच्या बचतीसंदर्भात महापालिकेकडून कुठलीही जनजागृती नसल्याने एका व्यक्तीला १३५ लिटर पाण्याची गरज असताना अडीचशे लिटर पाण्याची उधळण होत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. त्यामुळे नागपूरकरांची ‘बेफिकिरी’ सुरूच असल्याचे चित्र आहे. 

शहराला पाणीपुरवठा करणारे तोतलाडोह, नवेगाव खैरी जलाशये कोरडी पडली असून कन्हान नदीही आटली आहे. मध्य प्रदेशातील चौराई धरणातून पाणी मिळण्याची खात्री नाही. त्यात आतापासून नागरिकांनी कुलर सुरू केले असून पाण्याची मागणी साडेसातशे एमएलडीपर्यंत जाणार आहे. त्यामुळे महापालिकेने टंचाई निवारणासाठी शहरातील जुन्या विहिरी तसेच बोअरवेलकडे धाव घेतली. 

मात्र, सर्व प्रयत्न करताना पाण्याची उधळपट्टीवर नियंत्रणासाठी महापालिकेकडून अद्यापही पुढाकार घेतला नाही. शहरात प्रतिव्यक्ती १३५ लिटर पाण्याची गरज आहे. परंतु,  दररोज अडीचशे लिटर पाण्याचा वापर होत असल्याचे उच्चपदस्थ सूत्राने नमूद केले. त्यामुळे  शहर टंचाईच्या उंबरठ्यावर असतानाही नागरिकांकडून पाण्याची उधळण सुरूच असल्याचे चित्र आहे. शहरातील अनेक भागांत चारचाकी, दुचाकी वाहने धुण्यासाठी अद्याप पिण्याच्या पाण्याचा वापर करीत आहेत. 

ज्यांच्याकडे विहिरी आहे, तेही नळातून येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा अंगणातील झाडे, धुणी, भांडी आदीसाठी करीत असल्याचे विविध भागांतील वास्तव आहे. एकीकडे काही भागात टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे, त्याचवेळी पाण्याची उधळपट्टी असल्याची विरोधाभासी चित्र दिसून येत आहे. पाण्यासंदर्भात महापालिकेने जनजागृती मोहीम सुरू करण्याची गरज पर्यावरणवादी कौस्तुभ चॅटर्जी यांनी केली.

करार सुधारणासंदर्भातील विनंती अर्ज प्रलंबित 
तोतलाडोह येथील पेंच प्रकल्पात ६० टीएमसी पाण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. यातील ३५ टीएमसी पाणी मध्य प्रदेशला तर २५ टीएमसी पाणी महाराष्ट्राला असा करार आहे. परंतु, प्रत्यक्षात ४२ टीएमसी पाणीच जमा होते. यापैकी २१ टीएमसी मध्य प्रदेश व २१ टीएमसी पाणी महाराष्ट्र वापरते.

२०१६ पर्यंत मध्य प्रदेश या पाण्याकडे दुर्लक्ष करीत होते. मात्र, आता त्यांनी चौराई धरणात ४७० दलघमी पाणी वळविले. त्यामुळे पाण्यासंबंधातील करारात सुधारणा करण्यात यावी, असा विनंती अर्ज केंद्र सरकारकडे केला असून तो प्रलंबित असल्याचे सूत्राने नमूद केले. 

कोलार-कन्हान धरणाकडे दुर्लक्ष 
भविष्यात पेंच, नवेगाव खैरीतून मुबलक पाण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे महापालिकेने नव्या जलस्त्रोताचा शोध सुरू केला. परंतु महापालिकेची आर्थिक टंचाई बघता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये नव्या जलस्त्रोताच्या बांधकाम करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले होते.

कोलार-कन्हान नदीच्या संगमाजवळ १६० दलघमी क्षमतेचे धरण प्रस्तावित आहे. या धरणाबाबत सल्लागार नियुक्ती, डिझाइन आदी कामे झाली. परंतु, पुढील कामांची गती मंदावली असल्याचे सुत्राने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com