जरीपटका, बेझनबागमध्ये ‘जल’आक्रोश

जरीपटका, बेझनबागमध्ये ‘जल’आक्रोश

नागपूर - महापौर नंदा जिचकार यांच्या झोननिहाय भेटीचा पहिला दिवस फारशा अडचणी न येता पार पडला. दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. २८) मनपाच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांना मात्र अनपेक्षितपणे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अनपेक्षितपणे अनेक महिला, युवक  आणि नागरिकांनी मंगळवारी झोनमधील प्रभाग ९ आणि १ च्या भेटीदरम्यान महापौरांच्या वाहनाला थांबवून तर काही वेळा पिच्छा करून समस्यांचा पाढा वाचला आणि न्याय देण्याची मागणी केली. यामुळे मनपाची चमूसुद्धा भांबावली होती. 

जनता आपल्या वस्तीच्या समस्या सोडविण्यासाठी नगरसेवकानंतर अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचते. कधी-कधी महापौरांना निवेदन देण्यात येतात. झोन कार्यालयात खेटा घालण्यात येतात, परंतु समस्या मात्र सुटत नाही. मात्र, संत्रानगरीच्या महापौर नंदा जिचकार यांनी जनतेचे प्रश्‍न जाणून घेण्यासाठी चक्क प्रशासनला जनतेसमोर उभे केल्यानंतर काहीच समस्या नाही असे सांगणाऱ्यांवर बुमरॅंग झाल्याची वेळ नागरिकांनी आणली आहे. 

बुधवारी महापौरांनी जिंजर मॉल, दीपक  मेडिकल, बाबा हरदास धर्मशाळा, नारा घाट, सुदर्शन कॉलनी, लुंबिनीनगर, ख्रिश्‍चन कॉलनी, पंजाबी लेईन, शक्ती नाला आदी ठिकाणी भेट दिली. भेटीदरम्यान अनेक भागांमध्ये नागरिकांनी महापौरांवर विविध प्रश्‍नांचा भडिमार केला. त्याला उत्तर देताना अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना अवघड झाले होते.

जिंजर मॉल - रस्त्यावरील  बाजारामुळे रहदारीचा त्रास
महापौर येणार, समस्या ऐकून घेणार हे प्रभाग क्रमांक १ मधील निवडक लोकांना माहीत होते. सकाळचे साडेदहा वाजले होते. महापौर नंदा जिचकार यांच्यासह सहायक आयुक्तांपासून तर सारे अधिकारी ‘जिंजल मॉल’जवळ पोहोचले. येथील बाजारातील समस्या भाजीमंडी समितीचे अध्यक्ष सतीश नागदेवते यांनी महापौरांसमोर मांडल्या. रस्त्यावर थाटण्यात येणाऱ्या बाजारामुळे येथील रहदारीला प्रचंड त्रास होत असल्याची तक्रार या भागातील नागरिकांनी केली.   

नर्सच्या भरवशावर मनपाचे रुग्णालय 
जरीपटका परिसरात महापालिकेचे रुग्णालय आहे. या रुग्णालयात एक वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, सफाई कामगार आणि औषध निर्माता ही चार पदे आहेत. मात्र, बुधवारी जरीपटक्‍यातील महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्‍टर उपस्थित नव्हते. औषध निर्माताही उपस्थित नव्हता. सफाई कामगार आणि परिचारिका (नर्स) दोघे उपस्थित होते. झोनच्या विभागीय अधिकारी डॉ. देवस्थळे यांच्याकडे येथील अतिरिक्त कारभार असल्याचे परिचारिकेने सत्य उघड केले. यावेळी या रुग्णालयात डॉक्‍टरऐवजी भिंतीवर देवदेवितांचे फोटो मात्र लावण्यात आले असून त्यांच्या सभोवताल रोषणाई केली होती, असे आरोग्याचे भेसूर चित्र सकाळच्या चमूसमोर रुग्णांनी उभे केले.

बेझनबागवासी तुंबलेल्या नाल्यामुळे हैराण
श्री गुरू हरक्रिशन पब्लिक स्कूलच्या समोर एक तुंबलेला नाला आहे. या नाल्यात परिसरातील कचरा टाकण्यात येत असल्याने अतिशय दुर्गंधी येत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला असल्याचे शाळेतील शिक्षिका आणि जमलेल्या नागरिकांनी सांगितले. यावेळी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन लवकरच योग्य कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले.

११ वर्षांपासून रस्त्यांची समस्या 
अकरा वर्षांपासून रस्त्यांची समस्या आहे. सातत्याने पाठपुरावा करीत आहे. आमदार डॉ. मिलिंद माने यांच्या हस्ते रस्त्याचे उद्‌घाटन झाले, परंतु त्यानंतर तेथे काहीच झाले नाही. दुसऱ्यांदा स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनीही उद्‌घाटन केले. एकाच कामाचे दोनदा भूमिपूजन झाल्यानंतरही रस्ता तयार होत नसल्याची खंत व्यक्त करीत येथील मंजूषा काळबांडे यांनी पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून चिमुकल्या मुलांना शाळेत सोडावे लागत असल्याची व्यथा यावेळी मांडली. निवेदनही दिले, परंतु याचा लाभ होईल का? हा सवालही काळबांडे यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com