पश्‍चिमपेक्षा पूर्व नागपूरच्या भूगर्भात अधिक पाणी

राजेश रामपूरकर
गुरुवार, 25 एप्रिल 2019

नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्‍यांमध्ये वालुकायम, बेसॉल्ट आणि रूपांतरित या तिन्ही प्रकारचे खडक आढळतात. त्यामुळेच काही ठिकाणी पाण्याची स्थिती चांगली असताना काही तालुक्‍यांना दुष्काळाच्या झळा बसत आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोळसा खाणी, मॅंगनीजचे भांडार आहे. येथे तिन्ही प्रकारचे खडक सापडत असल्याने भूवैज्ञानिकांसाठी संग्रहालय असाच हा प्रदेश आहे. त्यामुळे भूवैज्ञानिक अभ्यासकांची पावले कायम इकडे वळतात. 
- डॉ. वर्षा माने, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, नागपूर

नागपूर - पूर्व आणि पश्‍चिम नागपूर अशा दोन भागात शहराची सांस्कृतिकच नव्हे तर नैसर्गिक विभागणीही झाली आहे. आर्थिकदृष्ट्या विचार केल्यास पश्‍चिममध्ये अधिक श्रीमंती असली तरी पाणी पातळीत पूर्व अधिक सधन प्रदेश आहे. पश्‍चिमच्या भूगर्भात बेसॉल्ट खडक तर पूर्वमध्ये रूपांतरित खडक असून, त्यात पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे. 

मानवाने कितीही प्रगती केली तरी पाण्यासाठी त्याला पावसाच्याच पाण्यावर अवलंबून राहावे लागते. मध्य प्रदेशने चौराई धरण बांधल्याने अर्ध्यापेक्षा अधिक भागाला पाणीपुरवठा करण्याऱ्या पेंच धरणातील पाणीसाठा निम्मा झाला. महापालिका म्हणा किंवा सरकारने अद्याप पर्यायी व्यवस्था करण्यास स्वारस्य दाखवत नसल्याने भविष्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. जमिनीतील पाणी म्हणजे भूपृष्ठ जल व जमिनीखालील पाणी म्हणजे भूजल. पावसाळ्यात नाले, नद्या यासोबतच जमिनीवरून पाणी वाहते. ते भूपृष्ठावर साठवलेही जाते. या प्रवासात हे पाणी प्रथम मातीच्या ओलाव्यात साठले जाऊन तो संपृक्त झाल्यावर गुरुत्वाकर्षणाद्वारे जमिनीखाली उताराच्या दिशेने वाहत जाऊन खडकांत साठवले जाते. त्यामुळे पूर्व नागपुरातील भूजलाची साठवण क्षमता अधिक आहे. जलधरांच्या साठवण क्षमतेनुसार भूजल साठा कमी अधिक होत असतो. एकदा का हा खडक संपृक्त झाला की मग हे पाणी जलधरांमधून झऱ्यावाटे बाहेर पडण्यास सुरुवात होते. मात्र, बेसॉल्ट खडक कठीण असल्याने त्यात पाण्याची साठवण क्षमता कमी असते. त्यामुळेच पश्‍चिम नागपुरातील भूभाग सर्वसाधारणपणे भूजलाचा साठा कमी असल्यानेच पश्‍चिमपेक्षा पूर्व नागपूर पाण्यासाठी श्रीमंत असल्याचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा कार्यालयाने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले.

Web Title: Water Level Nagpur Basalt rocks