जलवाहिनी फुटली; तत्परतेने दुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

नागपूर : दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असताना जलवाहिनीच्या गळतीने नागरिकांच्या जाचात भर पडली. बुधवारी रात्रीही लक्ष्मीनगर जलकुंभापर्यंतची जलवाहिनी फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. मात्र, मनपा व ओसीडब्ल्यूचे तांत्रिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज दुपारपर्यंत युद्धस्तरावर दुरुस्ती करून सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत केल्याने पश्‍चिम व दक्षिण-पश्‍चिम नागपूरवासींना दिलासा मिळाला.

दिवसाआड पाणीपुरवठ्याअंतर्गत काल, बुधवारी पाणी बंद होते. बुधवारी रात्री दोनच्या सुमारास लक्ष्मीनगरच्या जलकुंभाला पाणी पोहोचविणारी जलवाहिनी फुटाळा येथील गजानन महाराज मंदिराजवळ फुटली. त्यामुळे दक्षिण-पश्‍चिम व पश्‍चिम नागपूरकरांना आजही पाणी मिळण्याची शक्‍यता नव्हती. उद्या, शुक्रवारी पुन्हा पाणी बंद असल्याने सलग तीन दिवस पाणीटंचाईची झळ पश्‍चिम व दक्षिण-पश्‍चिममधील नागरिकांना बसण्याची शक्‍यता होती. मात्र, ओसीडब्ल्यू, महापालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पहाटेपासून युद्धस्तरावर कामे सुरू केली. दुपारपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर जुन्या लक्ष्मीनगर जलकुंभांतर्गत वस्त्यांमध्ये सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा करण्यात आल्याचे ओसीडब्ल्यूने कळविले. याशिवाय लक्ष्मीनगर तसेच मंगळवारी झोनमध्ये जलवाहिनीला गळती लागल्याचे पुढे आले. या ठिकाणीही जलवाहिनी दुरुस्ती केल्याने आज पाणी मिळाले. मात्र, काही भागात दररोजच्या वेळेप्रमाणे पाणी न आल्याने नागरिकांत नाराजी व्यक्‍त करण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water line burst