वर्धेकरांच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला; धामच्या रखडलेल्या उंचीचा मार्ग मोकळा 

file photo
file photo

वर्धा : येथील धाम नदीवर असलेल्या प्रकल्पाच्या उंचीकरिता मागील 20 वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. या कामाकरिता निधी आला होता पण, कामाची परवानगी रखडली होती. शासनाने आता या कामाला हिरवी झेंडी दिली असून हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येणार आहे. उंची वाढताच वर्धेकरांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होणार असून सिंचन क्षमताही वाढणार आहे. 

जमिनीचा प्रश्‍न लागला मार्गी 
या प्रकल्पाची उंची 1.90 मिटरने वाढवून प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी 328.60 मीटरवरून 330.50 मीटर होणार आहे. यामुळे या प्रकल्पात 19.541 दलघमी एवढा अतिरिक्‍त पाणीसाठा करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ही उंची वाढताच धरणाच्या अस्तित्वातील 170 मीटर लांबस्वयंचलीत द्वार विरहित सांडव्याची उंची 0.60 मिटरने कमी करून सांडव्यावर 2.50 मीटर उंचीचे व 17 मीटर लांबीचे स्वयंचलित द्वार उभारण्याचे प्रस्तावित होते. या सर्व कामांना आता हिरवी झेंडी मिळाल्याने पाण्याचा संचय अधिक होणार आहे. या कामाकरिता खरी अडचण वनविभागाच्या जमिनीची असल्याचे पुढे आले होते. यामुळे वनविभागाला आतापर्यंत जमिनीकरिता10.91 कोटी वितरित करण्यात आले आहे. यातून आता जमिनीचा प्रश्‍न मार्गी लागला असून सर्वांना आता या कामाच्या शुभारंभाची प्रतीक्षा लागली आहे. आतापर्यंत अनेकवेळा मंत्रालयात पाठविण्यात आलेल्या या प्रस्तावाला अखेर दोन दिवसापूर्वी मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाची जबाबदारी पहिले लघू पाटबंधारे विभागाकडे होती. आता ते का वर्धा पाटबंधारे विभागाकडे देण्यात आले आहे. 

हे वाचा— बिअर बार चालकांसाठी आनंदाची बातमी! सरकारच्या नव्या सूचना जाहीर, वाचा...

124 हेक्‍टरवर वाढणार सिंचन 
या प्रकल्पाची उंची वाढताच परिसरातील 124 हेक्‍टरवर सिंचन वाढणार आहे. याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. यात काढण्यात येणाऱ्या किनगाव वितरीकेचा लाभ हिंगणघाट तालुक्‍यातील शेतकऱ्यांना होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

वर्ध्यासह 26 गावांची पाणीटंचाईची समस्या मार्गी 
या प्रकल्पाची उंची वाढताच पाण्याची साठवण क्षमताही वाढणार आहे. ही क्षमता वाढताच वर्धेसह आसपासच्या 26 गावांतील पाणीटंचाईची स्थिती मार्गी निघणार आहे. या गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. यातच या प्रकल्पातून पाण्यासाठी पाइपलाइन टाकण्यात येणार असल्याने पाण्याचा अपव्ययही कमी राहणार आहे. 

अखेरची पाचवी परवानगी 
या धरणाच्या मजुरीकरिता एकूण पाच परवानगीची आवश्‍यकता होती. यात चार परवानगीचे काम पूर्वीच झाले होते. काही कारणास्तव वनविभागाची परवानगी अडली होती. अखेर ती पाचवी परवानगी वनविभागाच्या दिल्ली कार्यालयाने दिली. 

मागील 20 वर्षांपासून धामच्या उंचीचा प्रस्ताव मान्यतेकरिता प्रलंबित होता. याला अखेर परवानगी मिळाली आहे. धामची उंची वाढताच सिंचन आणि इतर वर्धेसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणारा आहे. 
- सुनील रहाणे,कार्यकारी अभियंता, वर्धा पाटबंधारे विभाग 

-संपादन : चंद्रशेखर महाजन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com