पर्यावरण संवर्धनासाठी अभ्यासक्रमात ‘जलसुरक्षा’; पाण्याचा दुष्काळ कायमचा हटविण्यासाठी पाऊल

Water safety subject in the curriculum for environmental conservation Amravati news
Water safety subject in the curriculum for environmental conservation Amravati news

मांजरखेड कसबा (जि. अमरावती) : महाराष्ट्रातील पाण्याचा दुष्काळ कायमचा हटविण्यासाठी पहिल्यांदाच पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून भावी पिढीमध्ये जलव्यवस्थापन रुजविण्यासाठी इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात जलसुरक्षा विषयाचा समावेश करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तक अधिक कृतीशील होण्यासाठी पहिल्यांदाच प्रत्यक्ष तळागाळात काम करणाऱ्या श्रमजीवींचा पाठ्यपुस्तक विषय समितीमध्ये तज्ज्ञ म्हणून समावेश करण्यात आला आहे. नुकतेच २०२०-२१ सत्रासाठी या जलसुरक्षा पुस्तकाचे डीजिटली विद्यार्थ्यार्पण करण्यात आले आहे.

सत्र २०२०-२१ पासून इयत्ता नववीसाठी व सत्र २०२१-२२ पासून इयत्ता दहावीसाठी जलसुरक्षा हा विषय स्वविकास व कला रसास्वाद, या श्रेणी विषयाऐवजी अनिवार्य करण्यात आला आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये जलशिक्षण, जलसंधारण, जलव्यवस्थापन व जलगुणवत्ता या चार मुख्य घटकांवर भर देण्यात आला असून जलचक्र, नदी बचावासाठी उपाययोजना, पर्जन्य जलसंधारणाचे फायदे, छतावरील पाण्याचे पुनर्भरण, विहिरी व कुपनलिका पुनर्भरण, पाणी वापराचा हिशेब, शासनातर्फे राबविण्यात आलेले विविध उपक्रम, जलशुद्धीकरण, सांडपाणी व्यवस्थापन, जलप्रदूषणावर उपाययोजना आदी विषयांचा समावेश केलेला आहे.

आपल्या कार्यामुळे पाण्याच्या भीषण प्रश्‍नावर ज्यांनी उपाययोजना करून आपल्या परिसराचा कायापालट केला असे हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, दत्तात्रेय देशकर, शास्त्रज्ञ डॉ. उपेंद्र धोंडे, सुरेश खानापूरकर, डॉ. उमेश मुंडल्ये, डॉ. दि. मा. मोरे आदींचा प्रत्यक्षात विषय समितीमध्ये समावेश आहे.

जीवनाश्‍यक विषय
जलसाक्षरता हा नियमित शालेय विषयापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे पहिल्यांदाच अभ्यासक्रम समितीत तज्ज्ञ शिक्षकांसोबत प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश केला आहे. पाणी हा जीवनाश्‍यक विषय असल्यामुळे या तज्ज्ञ व्यक्तींमुळे या विषयाला कृती व अनुभवाच्या माध्यमातून अधिक जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे. 
- राजीव पाटोळे,
सचिव, अभ्यासक्रम समिती, बालभारती

उपक्रमकेंद्रित पाठ्यपुस्तक
विद्यार्थ्यांना जलसुरक्षा विषयाच्या माध्यमातून त्यांच्या सभोवताली असणारी भिन्न प्रकारची परिस्थिती, काही समस्या व त्याचा जीवनावर परिणाम होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करता यावेत, हा उद्देश ठेवून उपक्रम केंद्रित पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. त्याचा विद्यार्थ्यांना निश्‍चित लाभ होईल. 
- गजानन मानकर,
अभ्यासगट सदस्य, बालभारती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com