बाप्पाच्या विसर्जनात पाणीटंचाईचे विघ्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

नागपूर : बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली असून, विसर्जनात पाणीटंचाईचे विघ्न येणार आहे. महापौरांनी कृत्रिम तलावांत पिण्याचे पाणी वापरू नये, असे स्पष्ट करीत विहिरीतील पाण्याचा वापर करण्याचे निर्देश मंगळवारी प्रशासनाला दिले. तलावांमध्ये विसर्जनाला बंदी असून, यंदा यात नाईक तलावाचीही भर पडली आहे.

नागपूर : बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली असून, विसर्जनात पाणीटंचाईचे विघ्न येणार आहे. महापौरांनी कृत्रिम तलावांत पिण्याचे पाणी वापरू नये, असे स्पष्ट करीत विहिरीतील पाण्याचा वापर करण्याचे निर्देश मंगळवारी प्रशासनाला दिले. तलावांमध्ये विसर्जनाला बंदी असून, यंदा यात नाईक तलावाचीही भर पडली आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्वतयारी संदर्भात महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेत व आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या उपस्थितीत महापालिकेत बैठक पार पडली. यावेळी विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी सूचना व संकल्पना मांडल्या. ग्रीन व्हिजिल फाउंडेशनतर्फे गणेश मूर्ती विसर्जनासाठी पिण्याचे पाणी न वापरण्याची सूचना करण्यात आली. शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे यासाठी मनपा प्रयत्नरत आहे. अशात गणेश विसर्जनासाठी कोणत्याही कृत्रिम टॅंकमध्ये जलकुंभातील पिण्याचे पाणी वापरू नये असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. स्वच्छ केलेल्या सार्वजनिक विहीरींचे पाणी विसर्जनासाठी वापरण्याचेही महापौरांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
मागील वर्षी सोनेगाव, गांधीसागर, सक्करदरा, अंबाझरी या महत्त्वाच्या तलावांमध्ये गणेशमूर्ती विसर्जनाला प्रतिबंध करण्यात आले होते. यावर्षी या तलावांसह नाईक तलावामध्येही कोणत्याही प्रकारच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होऊ नये यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. गणेशोत्सवात संकलित करण्यात येणारे निर्माल्य, सुगंधित अगरबत्ती आदी उपयोगी उत्पादने निर्माण करणाऱ्यांना विनामूल्य द्यावे, असेही महापौरांनी सांगितले.
बैठकीत विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, सत्तापक्ष प्रतोद दिव्या धुरडे, आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, विविध झोनचे सहायक आयुक्त, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water scarcity obstruction in the immersion of Bappa