अमरावती विभागातील पाणीसंकट तीव्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

अमरावती : विभागात यंदा पाणीसंकट चांगलेच तीव्र होण्याचे संकेत आहेत. विशेषतः अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांना पाणीसंकटाची झळ अधिक तीव्रतेने बसणार आहे. या दोन्ही जिल्ह्यांत मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. डिसेंबरमध्येच या दोन जिल्ह्यांतील 14 गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

अमरावती : विभागात यंदा पाणीसंकट चांगलेच तीव्र होण्याचे संकेत आहेत. विशेषतः अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांना पाणीसंकटाची झळ अधिक तीव्रतेने बसणार आहे. या दोन्ही जिल्ह्यांत मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. डिसेंबरमध्येच या दोन जिल्ह्यांतील 14 गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
अमरावती विभागातील मोठ्या, मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांत 46 टक्के जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात यंदा सर्वांत नीचांकी साठा शिल्लक आहे. गतवर्षी याच वेळी 782 दलघमी (72 टक्के) साठा होता. यंदा तो केवळ 366 दलघमी (39 टक्के) आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या अप्पर वर्धा धरणातील स्थिती चिंता वाढवणारी आहे. मोर्शी, वरुड, आष्टी, धामणगावरेल्वे शहर व ग्रामीण पाणीपुरवठा योजना या धरणावर अवलंबून आहे. सिंचनासाठी दोन पाळी पाणी सोडण्यात आले. त्यामध्ये कपात करीत तीन पाळ्या रद्द करण्याची वेळ जलसंपदा विभागावर आली आहे. मध्यम धरणांच्या श्रेणीतील पूर्णा प्रकल्पातही 16 दलघमी साठा आहे. सापन 34 व शहानूर व चंद्रभागामध्ये प्रत्येकी 30 दलघमी साठा आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णात साठाच नाही. तर, नळगंगा व पेनटाकळीने आताच तळ गाठण्यास सुरुवात केली. नळगंगात 9.86 (14 टक्के) व पेनटाकळीत 5.99 दलघमी (9 टक्के) जलसाठा आहे. या जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांपैकी मस कोरडा पडला आहे. कोराडी व तोरणातील जलसाठा तळ गाठू लागला आहे. कोराडीत 0.27 व तोरणात 0.92 दलघमी साठा शिल्लक आहे. ज्ञानगंगामध्ये 5.93, पलढगमध्ये 2.02, मन व उतावळीमध्ये अनुक्रमे 8.24 व 7.37 दलघमी पाणीसाठा आहे. यवतमाळमध्ये 619 दलघमी (60.44 टक्के), अकोला 222 दलघमी (60.40 टक्के)व वाशीममध्ये 257 दलघमी (58.05 टक्के) जलसाठा आहे. गतवर्षी या तीनही जिल्ह्यांत पाणीसंकट होते.

Web Title: water shortage in amravati division