लातूरसारखी वेळ विदर्भावर येऊ नये

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

जलपुर्नभरण काळाची गरज : 50 हजार लिटर पाणी संकलित

जलपुर्नभरण काळाची गरज : 50 हजार लिटर पाणी संकलित
नागपूर - दिवसेंदिवस पावसाची सरासरी कमी होत आहे. सध्या पाऊस जरी भरपूर पडत असला तरी तो पडण्याचा कालावधी कमी झाला आहे. जमिनीवर पाणी साचून न राहता ते वाहून जाते. त्यामुळे जमिनीची धूप वाढत आहे. धावत्या पाण्याला अडवून त्याचे पुनर्भरण करण्याची गरज आहे. तरच पुढील पिढीसाठी पाणी शिल्लक राहील. अन्यथा लातूरसारखी वेळ विदर्भावर येण्यास वेळ लागणार नाही.

विदर्भात नव्हे तर इतर कुठेही परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी काहीजण प्रयोगदेखील राबवित आहेत. नागपुरातील एका प्राध्यापकांनी स्वत:च्या घरापासून जलपुर्नभरणाच्या प्रयोगास सुरुवात केली. केवळ चार महिन्यांत घरबसल्या 50 हजार लिटर पाणी संकलित केले.

छतावरील जलपुनर्भरणातून हे शक्‍य आहे. केवळ चार महिन्यांची मेहनत आणि एकदाच करावी लागणारी आर्थिक गुंतवणूक आवश्‍यक असल्याचे हा प्रयोग राबविणारे भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. योगेश मुरकुटे सांगतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागात वरिष्ठ सहायक प्राध्यापक असलेले डॉ. मुरकुटे गेल्या 15 वर्षांपासून जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी रेशीमबागेतील स्वत:च्याच घरी छतावर जमा होणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी यंत्रणा उभारली. 365 पैकी 122 दिवस (चार महिने) पाऊस पडतो. तो सलग पडत नाही. रोज एक तास, दोन तास, कधी कुठे चार तास, असा हिशेब केला तर महाराष्ट्रात केवळ सरासरी 96 तास पाऊस पडतो. हे 96 तास म्हणजे 4 दिवस. या चार दिवसांच्या पावसावर आजच्या शहरी राहणीमानानुसार एखाद्या कुटुंबाला 72 दिवस पुरेल एवढा जलसाठा होऊ शकतो. या जलपुनर्भरणाच्या प्रयोगाची माहिती सर्वांना मिळावी, यातून जनजागृती व्हावी, यासाठी घराच्या दर्शनी भागातच हा प्रयोग केला. त्यामुळे त्यांच्या घरी येणारे या प्रयोगासंदर्भात माहिती घेतात. त्यामुळे जनजागृती करण्यासदेखील याची मदत झाल्याचे मुरकुटे यांनी सांगितले.

असा राबविला प्रयोग
घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी पाइपमधून एकत्र होईल, अशी व्यवस्था मुरकुटे यांनी केली. पहिल्या टप्प्यावर त्या पाण्याला जाळीतून प्रवाहित करून त्याच्यातील मोठा कचरा काढून घेतला जातो. शुद्ध पाणी थेट 2 फुटांचा चौरस आकार असलेल्या जलपुनर्भरण खड्ड्यात सोडण्यात येते. या खड्ड्यातील पहिला स्तर मोठ्या खडकांचा, दुसरा मध्यम तर तिसरा विटांचा आणि चौथा वाळूचा आहे. या चारही स्तरांतून पाण्याला प्रवाहित केल्यानंतरच ते संकलित पाणी विहिरीत सोडण्यात येते.

सद्यस्थितीत नागपुरात प्रत्येक व्यक्तीमागे दिवसाकाठी 175 लिटर पाणी खर्च होत आहे. यामुळे वाया जाणारे पाणी संकलित करणे आणि ते शुद्ध करून वापरणे गरजेचे आहे. यासाठी जलपुनर्भरण उत्तम उपाय आहे.
- प्रा. डॉ. योगेश मुरकुटे, भूगर्भशास्त्रज्ञ

Web Title: water shortage in vidarbha