यवतमाळात पाणी पेटले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

यवतमाळ - शहरातील प्रभाग क्रमाक १३मध्ये पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे. परिसरातील विहिरी आटल्याने नवे संकट उभे झालेले आहे. त्यामुळे या  भागात टॅकरने पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी ‘प्रहार’चे नगरसेवक नितीन मिर्झापुरे यांनी त्यांच्या सहकार्यासोबत विहिरीत ठिय्या आंदोलन केले. 

यवतमाळ - शहरातील प्रभाग क्रमाक १३मध्ये पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे. परिसरातील विहिरी आटल्याने नवे संकट उभे झालेले आहे. त्यामुळे या  भागात टॅकरने पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी ‘प्रहार’चे नगरसेवक नितीन मिर्झापुरे यांनी त्यांच्या सहकार्यासोबत विहिरीत ठिय्या आंदोलन केले. 

शहराची हद्दवाढ झाली आहे. त्यामुळे शहरालगतच्या अनेक ग्रामपंचायतीचा भाग शहरात आला आहे. प्रभाग क्रंमाक १३मध्ये लोहारा व वाघापूरचा भाग आहे. या भागात दरवर्षीच पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. मात्र, अजूनही यावर तोडगा काढलेला नाही. या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी नव्याने जलकुंभ तयार करण्यात आलेले आहे. मात्र, पाणीपुरवठा सुरू व्हायचा असल्याने या भागात यंदाही पाणीटंचाईचे चटके बसण्याची शक्‍यता आहे.  सुयोगनगर, प्रिया रेसीडेन्सी, राधाकृष्णनगरी, साने गुरुजी ले-आउट या भागासह प्रभागात येणाऱ्या इतरही भागांत पाणीटंचाईने डोकेवर काढले आहे. आठ-आठ दिवस नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक नितीन मिर्झापुरे यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. मात्र, त्यांच्या मागणीकडे फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचा आरोप करीत ‘प्रहार’चे नगरसेवक नितीन मिर्झापुरे यांनी त्याच भागातील कोरड्या पडलेल्या विहिरीत उतरून अभिनव आंदोलन केले. त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते संजय भगत, राहुल झाडे हे दोघेही विहिरीत बसले होते. दुपारी बारापासून ‘प्रहार’च्या या आंदोलनाला सुरुवात झाली. दुपारी पालकमंत्री मदन येरावार यांनी नगरपालिकेत पाणीपुरवठा आढावा सभा घेतली. या बैठकीत हा विषय चर्चेला आला. पालकमंत्र्यांनी यांनी दूरध्वनीवरून मिर्झापुरे व त्या भागातील नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी सचिन इंगोले, धीरज सोनटक्के, आकाश गावंडे, उमेश गावंडे, अनिल चव्हाण, स्वप्निल उजवणे, भास्कर गावंडे, आकाश समोसे यांच्यासह परिसरातील महिला, युवक व नागरिक उपस्थित होते.

Web Title: water shortage in yavatmal