आठ गावांची पाण्यासाठी पायपीट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

चंद्रपूर : तालुक्‍यातील आठ गावांसाठी सुरू करण्यात आलेल्या चिंचाळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला ग्रहण लागले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ही योजनाच बंद पडल्याने आठही गावांतील नागरिकांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, शेतातील विहिरीवरून नागरिक पाणी आणून आपली तहान भागवित आहेत.

चंद्रपूर : तालुक्‍यातील आठ गावांसाठी सुरू करण्यात आलेल्या चिंचाळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला ग्रहण लागले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ही योजनाच बंद पडल्याने आठही गावांतील नागरिकांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, शेतातील विहिरीवरून नागरिक पाणी आणून आपली तहान भागवित आहेत.
चंद्रपूर तालुक्‍यातील पिपरी, धानोरा, शेणगाव, सिदूर, चिंचाळा, वेंडली, नागाळा आणि वांढरी या गावांतील पाणीप्रश्‍न लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने काही वर्षांआधी चिंचाळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू केली. पाणीपुरवठा योजना सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. योजनेवर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे नियंत्रण असले तरी योजनेचे देखभाल,दुरुस्तीचे काम कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले आहे. योजना खूप जुनी झाली असून, पाइपलाइन ठिकठिकाणी लिकेज आहे. मोटारपंपही जुनी झाली असून, त्यात नेहमीच बिघाड येतो. वर्धा नदीत उन्हाळ्यात पाणी नसल्याने त्या दिवसांत नळयोजना बंद होती. आता काही दिवसांपूर्वीच योजना सुरू झाली. दोन दिवस पाणीपुरवठा सुरळीत होता. त्यानंतर पुन्हा योजना बंद करण्यात आली. आता पंधरा दिवसांचा काळ लोटला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. त्यामुळे या गावांतील नागरिक शेतातील विहिरींवर पाण्यासाठी गर्दी करीत आहे. सकाळपासून शेतातील विहिरीवर पाण्यासाठी रांगा लागत असल्याचे चित्र आहे.
समाजकल्याण सभापतींचे क्षेत्र
ही आठही गावे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती पाझारे यांच्या क्षेत्रातील आहे. मधल्या काळात त्यांनी कंत्राटदाराला सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले. तेव्हा पाणीपुरवठा सुरळीत झाला होता. आता मात्र पुन्हा पाण्याच्या समस्येने डोकेवर काढले आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी या गावांतील लोकांच्या जिल्हा परिषदेत चकरा वाढल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water sortage for eight villagers