बहादुऱ्याची तहान भागवतेय टॅंकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

तीन वर्षांपासून चित्र कायम - गावकरी टॅंकरमुक्तीच्या प्रतीक्षेत

नागपूर - नागपूरपासून १३ किलोमीटर अंतरावर बहादुरा हे गाव आहे. गावाची  लोकसंख्या ३० हजारांच्या जवळपास आहे. मात्र, या गावाला गेल्या तीन वर्षांपासून एकच  समस्या भेडासावत आहे. तीन नळयोजना, बोअरवेल असूनही तहान भागविण्यासाठी टॅंकरवर अवलंबून राहावे लागत आहे. 

तीन वर्षांपासून चित्र कायम - गावकरी टॅंकरमुक्तीच्या प्रतीक्षेत

नागपूर - नागपूरपासून १३ किलोमीटर अंतरावर बहादुरा हे गाव आहे. गावाची  लोकसंख्या ३० हजारांच्या जवळपास आहे. मात्र, या गावाला गेल्या तीन वर्षांपासून एकच  समस्या भेडासावत आहे. तीन नळयोजना, बोअरवेल असूनही तहान भागविण्यासाठी टॅंकरवर अवलंबून राहावे लागत आहे. 

नरसाळा, दिघोरी, बहादुरा ही गावे नागपूर शहरालगत आहेत. बहादुरा हे गाव ग्रामीण क्षेत्रात येत असून, येथे ग्रामपंचायतदेखील आहे. गावाचा विकास झाला. मात्र, पाणीटंचाईची समस्या दूर झालेली नाही. दरवर्षी उन्हाळ्यात या गावाला प्रशासनातर्फे टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. यंदादेखील हेच चित्र कायम आहे. सद्यस्थितीत या गावातील सात वॉर्डांना दररोज ८ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गावात तीन नळयोजना, बोअरवेल, विहिरी आदी पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहेत. मात्र, या भागाची भूजल पातळी खालावल्याने दोनशे ते तीनशे फूट बोअरवेल खोदूनदेखील पाणी लागत नसल्याने गावकरी त्रस्त आहेत. सकाळ होताच गावातील महिलांची पाण्यासाठी लगबग सुरू होते. गावात आठ दहा बोअरवेलला सध्या बऱ्यापैकी पाणी येत  असल्याने त्यावर बरीच तहान भागविली जाते. मात्र, गावाच्या लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या फारच तोकडी आहे. गेल्या महिनाभरापासून गावात पाणीटंचाईची समस्या अधिक बिकट झाली आहे.

सुरुवातीला दोन तीन टॅंकरची संख्या आता दहापर्यंत पोचली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे सध्या बहादुऱ्याला ८ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. काही गावकरी अजूनही दुचाकी आणि चारचाकीवर डबक्‍या ठेवून पाणी आणतात. काही टॅंकरच्या प्रतीक्षेत डोळे लावून असतात. पाणीटंचाईचा प्रश्‍न
गेल्या तीन वर्षांपासून कायम असल्याने गावकऱ्यांनी प्रशासनाप्रती रोष व्यक्‍त केला. पाणीटंचाईचे सावट गावावरून कधी एकदाचे दूर होते आणि दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होणारी समस्या दूर होते याकडे गावकरी नजर लावून आहेत. 

पुढील वर्षीपासून मुक्‍तता
बहादुऱ्याला पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या पेरी अर्बन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. पुढील वर्षीपर्यंत या योजनेचे काम पूर्ण होईल. त्यानंतर या गावाला टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनातर्फे केला जात आहे. 

टॅंकरची संख्या वाढविणार
गेल्या आठवड्यापासून बहादुऱ्यातील पाणीटंचाईची समस्या वाढली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या वाढविण्यात यावी. यासाठी गट विकास अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. टॅंकरची संख्या वाढविली जाणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य शुभांगी गायधने यांनी सांगितले.

२४ गावांना ३८ टॅंकरने पाणीपुरवठा
पाणीटंचाई निवारणाची कामे नियोजित वेळेत सुरू करण्याचे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे नियोजन यंदा पूर्णपणे फसले. त्यामुळे जिल्ह्यातील २४ गावांना तीव्र पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे सध्या पाणीटंचाई निवारणार्थ ३८ टॅंकर लावले आहेत.

९०० पैकी केवळ ६१ बोअरवेल पूर्ण
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणार्थ यंदा ९०० बोअरवेल मंजूर करण्यात आले. मात्र, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे सद्यस्थितीत केवळ ४१ गावांत ६१ बोअरवेलची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे उर्वरित कामे उन्हाळा संपण्यापूर्वी पूर्ण होणार का? यावर प्रश्‍नचिन्ह आहे.

Web Title: water tanker in bahadura village