टॅंकरचालक झाले ‘वसुलीभाई’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

महापालिकेची नामुष्की
नॉननेटवर्क भागात होणाऱ्या नि:शुल्क पाणीपुरवठ्याला टॅंकरचालकांकडून हरताळ फासल्याचे चित्र आहे. परिणामी पाणीपुरवठा सुविधेला धक्का बसला आहे. कुणीही टॅंकरचालक पैशांची मागणी करत असेल तर झोननिहाय कार्यरत डेलीगेटला सूचना द्यावी, असे सांगण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली आहे.

नागपूर - शहरात पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असून, टॅंकरचालक याचा लाभ घेत असल्याचे महापालिकेने शनिवारी पत्रक काढून कबूल केले. पाणी वितरणाचे जाळे नसलेल्या भागात टॅंकरने निःशुल्क पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ‘वसुलीभाई’ टॅंकरचालकांना पैसे देऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

जलवाहिनीचे जाळे नसलेल्या भागात टॅंकरने नि:शुल्क पाणीपुरवठा केला जातो. परंतु, टॅंकरचालक नागरिकांकडून पाण्यासाठी पैसे उकळत आहेत. पैसे खर्च करणाऱ्यांना पाण्याची विशेष सुविधा पुरवत असल्याचेही आरोप होत आहेत. त्यामुळे गरज असलेल्या भागात आठवड्यातून एक वेळा टॅंकर पुरविण्यात येते. दक्षिण नागपुरातील सिद्धेश्‍वरनगरी या वस्तीसाठी आठवडाभरातून एक टॅंकर पाणी दिले जाते. अनेक ठिकाणी टॅंकर वेळेवर पोहोचत नसल्याच्या तक्रारी आहेत.

शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या जलसाठ्यात आवश्‍यक पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे शहर पाणीटंचाईला सामोरे जात आहे. टंचाईच्या काळात टॅंकरचालकांनी सामान्य नागरिकांची लूट सुरू केल्याचे महापालिकेनेच मान्य केले आहे. त्यांच्यावर कुठल्याही कारवाईऐवजी नागरिकांनाच पैसे देऊ नये, असे आवाहन केले. त्यामुळे टॅंकरचालकांकडून सामान्य नागरिक पुन्हा वेठीस धरण्याची शक्‍यता बळावली आहे.

१९ गावांना टॅंकरने पाणी
नागपूर - कमी पावसामुळे धरणात जलसाठा कमी आहे. दुसरीकडे टंचाईचे काम निम्मेही पूर्ण झालेली नाही. पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेने १९ गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. या गावांमध्ये दिवसभरात एकूण २४ टॅंकर्स पुरविले जात आहेत. अनेक गावांमधून पाण्यासाठी टॅंकरची मागणी होत आहे.

बिडगाव, लावा, सुराबर्डी, बोथली, खापा निपाणी, मोहगाव ढोले, गिदमगड, गोठणगाव, सुकळी कलार, वलनी, मौराळा, सीताखैरी, निलडोह, कवडस, तांडा, खापरी रेल्वे, मोटाड पांजरी, पिल्कापार व व्याहाड या गावांत पाणीटंचाई असून, टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. यातील बहुतांश गावे शहरालगतची आहेत. कामठी तालुक्‍यातील बिडगाव वगळता अन्य गावे हिंगणा व नागपूर ग्रामीण तालुक्‍यातील आहेत. निलडोह येथे सर्वाधिक ७८ टॅंकरच्या फेऱ्या होत आहे. पाणीटंचाई कृती आराखड्याअंतर्गत जिल्ह्यातील एकूण १,२८४ गावांमध्ये विविध उपाययोजना आखल्या आहेत. यात विंधन विहीर, विहीर खोलीकरण, मळ काढणे आदी कामांचा समावेश आहे. आतापर्यंत केवळ १३० गावांमध्ये या उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत. 

३० गावांमध्ये बोअरवेलची कामे पूर्ण 
वर्ष २०१९ पाणीटंचाई कृती आराखड्यात जिल्ह्यातील ४९० गावांमध्ये ८१२ बोअरवेल तयार करण्याचा प्रस्ताव होता. पहिल्या दोन्ही टप्प्यांत कंत्राटदारांनी सहकार्य न केल्यामुळे कामे सुरू होण्यास विलंब झाला. आता पाच कंत्राटदारांनी निविदा भरल्या आणि काम सुरू झाले. हिंगणा तालुक्‍यात १४ ठिकाणी बोअरवेलचे काम पूर्ण झाले आहे. सावनेर येथील चार ठिकाणी काम सुरू आहे. या आठवड्यात मौदा तालुक्‍यातील कामे सुरू झाली. आतापर्यंत एकूण ३० गावांमधील कामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Water Tanker Water Supplier Recovery Municipal