माणिकगड पहाडातील धबधबे खळाळले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

बिबी (जि. चंद्रपूर) : नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या माणिकगड पहाडावरील डोंगरदऱ्यातील धबधबे मुसळधार पावसाने खळाळून वाहत आहेत. याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आणि ट्रेकर्सची ओघ वाढली आहे.

बिबी (जि. चंद्रपूर) : नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या माणिकगड पहाडावरील डोंगरदऱ्यातील धबधबे मुसळधार पावसाने खळाळून वाहत आहेत. याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आणि ट्रेकर्सची ओघ वाढली आहे.
माणिकगड पहाड निसर्ग सौंदर्याची अलौकिक देणच आहे. या परिसरातील कोरपना व जिवती तालुक्‍याच्या सीमावर्ती भागात अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे पावसाळ्यात येथे पर्यटकांची गर्दी वाढते. कोरपना तालुक्‍यातील सावलहीरा -येल्लापूर मार्गावरील भिमलकुंड धबधबा, जांभुळझरा गावाजवळच्या जंगलातील धबधबे, घाटजाई जंगलातील धबधबा, मेहंदी गावाजवळच्या नाल्यावरील बोधबोधी धबधबा, पैनगंगा- विदर्भा नदी संगमावरील संगमेश्वर धबधबा व जिवती तालुक्‍यातील चिखली व सिंगारपठार येथील धबधबा सध्या ओसंडून वाहत आहे. कोरपना तालुक्‍यातील बोदबोधी वगळता इतर ठिकाणच्या धबधब्यावर जाण्यासाठी कुठेच पक्का रस्ता नाही. तरी मात्र दरवर्षी येथे मोठ्या संख्येत पर्यटकांची गर्दी असते. येथील निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य त्यांना भुरळ घालत आहे. या परिसरातील पर्यटन फुलवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ व वनविभागाने रस्ता तसेच पर्यटन विषयक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.
सिंचन प्रकल्प बनले पर्यटन स्थळ
कोरपना तालुक्‍यातील अमलनाला व पकडीगुड्डम हे दोन मध्यम सिंचन प्रकल्प आहे. हे प्रकल्प माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी आहेत. या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य पावसाळ्यात डोळ्यात साठवण्यासारखे असते. तसेच येथील वेस्टवेअरवरून ओवरफ्लो होणाऱ्या पाण्यात अंघोळ करण्याची एक वेगळीच मजा येते. त्यामुळे अलीकडच्या काही काळापासून हे सिंचन प्रकल्प पर्यटन स्थळ बनले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waterfall falls in Manikgad hill