जीवनात आणला टरबुजाने गोडवा

गुमगाव - टरबुजाच्या शेतात प्रयोगशील शेतकरी प्रभाकर आष्टणकर सचिन आणि पंकज या दोन मुलांसह.
गुमगाव - टरबुजाच्या शेतात प्रयोगशील शेतकरी प्रभाकर आष्टणकर सचिन आणि पंकज या दोन मुलांसह.

गुमगाव - पारंपरिक पिकांना दरवेळी चांगला बाजारभाव मिळेलच असे नाही. त्यामुळे आता बळीराजाकडून शेतीत वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. एकाच पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करून आर्थिक उन्नती साधण्याचा यशस्वी प्रयत्न ४६ वर्षीय प्रभाकर दौलत आष्टणकर या शेतकऱ्याने केला. त्यांचा हा प्रयत्न परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणदायी ठरत आहे.

हिंगणा तालुक्‍यातील गुमगाव येथील प्रभाकर दौलत आष्टणकर यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर घरच्या शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे असणाऱ्या शेतीत विविध प्रयोग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते कापूस, तूर, टमाटर, चना आदी पिके घेतात. ‘पिकते ते विकण्यापेक्षा, जे विकते ते पिकवायचे’ असा मूलमंत्र मनाशी बाळगून यंदा त्यांनी बाजारात मागणी असणाऱ्या टरबूज या पिकाची पहिल्यांदाच लागवड केली. सध्या टरबूज फळांची काटणी सुरू आहे. बाजारातील मागणी वाढली असताना उत्पादन मिळाल्याने आपल्या पहिल्याच प्रयोगात चोख व्यवस्थापन केल्याने टरबुजाचे पीक हे त्यांना लाखमोलाचे ठरत आहे.

आष्टणकर यांच्या गुमगाव शिवारात असलेल्या शेतातील विहिरीजवळ आधुनिक तंत्रज्ञान वापरून पाण्यासाठी पंप बसविले आहेत. मानवरहीत पद्धतीने यंत्राच्या साहाय्याने पिकांना पाणी आणि विद्राव्य खते दिल्या जातात. आधुनिक तंत्रज्ञान, मार्केटचा अभ्यास यांची सांगड घालून तयार केलेली पीकपद्धती त्यांना आज फायदेशीर ठरत आहेत. मातीतील पोषक द्रव्यांपासून खतांच्या मात्रेपर्यंत सगळ्या गोष्टींच्या काटेकोर व्यवस्थापनामुळे ४.५ एकर टरबूज शेतीमध्ये प्रभाकर आष्टणकर हे भरघोस उत्पादन घेत आहेत. त्यांच्या शेतातील एक फळ ५ ते ७ किलो वजनाचे असून लालबुंद व चवीला गोड आहे. सध्याचे बाजारभाव व होणारे उत्पादन लक्षात घेता आष्टणकर यांना सुमारे १५ लाख रुपयांचा निव्वळ नफा होण्याची आशा आहे. शेतीतील नवीन आणि यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी त्यांच्या शेतावर परिसरातील शेतकऱ्यांचा कायम राबता असतो.

शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याची मला आवड आहे. माझी दोन्ही मुले सचिन आणि पंकज यांना शिक्षणाबरोबरच शेतीमध्येसुद्धा गोडी असल्याने माझी ताकद वाढलेली आहे. आपल्याकडील शेतकरी कष्ट करणारे आहेत व येथील वातावरणही शेतीसाठी अनुकूल आहे. समस्यांकडे पाहून रडत बसण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाने त्यावर मात करत यश संपादन करता येऊ शकते.
- प्रभाकर दौलत आष्टणकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com