पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न : फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

पंचगंगेची धोका पातळी 43 फुटांवर असून सध्या पुराचे पाणी 52 फुटांवर गेले आहे. त्यामुळे विशेषतः शिरोळ तालुक्यातील सहा गावे, कोल्हापूर शहर, हातकणंगले तालुक्यातील एक गाव, तसेच चिखली व आंबेवाडी या गावांचा परिसर प्रभावित झाला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या (एनडीआरएफ) दोन तुकड्या त्याठिकाणी कार्यरत आहे.

यवतमाळ : राज्यात पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे ही स्थिती उद्भवली आहे. कोल्हापूर, सांगली, पुणे व नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पूरपरिस्थिती बिकट झाली असून या संकटावर मात करण्यासाठी सर्व साधनांचा वापर केला जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते मंगळवारी (ता. सहा) सकाळी दहाला येथील नियोजन समितीच्या सभागृहात पत्रकारपरिषदेत बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस महाजनादेश यात्रेनिमित्त यवतमाळात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आदिवासी विकासमंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री मदन येरावार, भाजपचे सरचिटणीस आमदार सुजीतसिंग ठाकूर, कामगार राज्यमंत्री संजय कुटे, आमदार डॉ. संजीवरेड्डी बोदकुरवार, निलय नाईक व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे उपस्थित होते. पुढे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या पूरपरिस्थिती बिकट झाली आहे. त्याचा सातत्याने आढावा घेत आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

पंचगंगेची धोका पातळी 43 फुटांवर असून सध्या पुराचे पाणी 52 फुटांवर गेले आहे. त्यामुळे विशेषतः शिरोळ तालुक्यातील सहा गावे, कोल्हापूर शहर, हातकणंगले तालुक्यातील एक गाव, तसेच चिखली व आंबेवाडी या गावांचा परिसर प्रभावित झाला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या (एनडीआरएफ) दोन तुकड्या त्याठिकाणी कार्यरत आहे. आज सकाळी अधिकच्या तुकड्या पाठविण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सोबतच लष्कराचे 80 जवान चार मोटारबोटींमधून लोकांना सुरक्षित स्थळी नेत आहेत. लवकरच हवाईदलाच्या माध्यमातून हेलिकॉप्टरदेखील उपलब्ध करून दिले जाणार आहे.

ज्याठिकाणी एअरलिफ्टिंग करण्याची गरज असले त्याठिकाणी एअरलिफ्टिंग करण्यात येईल. जवळजवळ 1500 कुटुंबांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. कोस्टगार्डचीदेखील मदत घेतली जात आहे. सांगलीत देखील मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती उद्भवली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथका (एनडीआरएफ)ची एक तुकडी त्याठिकाणी पोहोचली आहे. अधिकची तुकडीदेखील पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पूरपरिस्थितीचा मी आज सकाळीच आढावा घेतला आहे. राज्याचे मुख्य सचिव  पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील या भागात दौर्‍यावर असतील. तशा सूचना सर्व मंत्र्यांना केल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे पूरसंकट गंभीर
कर्नाटकचे मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांच्याशी मी आज बोलतो आहे. त्यांनी कर्नाटकातील धरणातून विसर्ग वाढविला तर सांगलीतील पूरपरिस्थिती आटोक्यात येऊ शकते. मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांनी कोयनेचा विसर्ग कमी करण्याची विनंती केली आहे. दोन्ही राज्यांमध्ये पूरपरिस्थिती धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे उद्भवली आहे. राज्याचा उत्तर भागात विशेषतः: पुणे, नाशिकचा भाग, पिंपरी चिंचवडचा भाग काल मोठ्या प्रभावित झाला होता. आज त्याठिकाणची परिस्थिती आटोक्यात आहे. काही कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

उद्या घेणार पूरपरिस्थितीचा आढावा : मुख्यमंत्री
राज्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती संदर्भाने उद्या (बुधवारी) बैठक घेणार आहे. कोणत्या उपाययोजना करता येतील, त्याचा आढावा घेण्यात येणार आहे. सोमवारी दिवसभर मी अधिकारी व लोकांच्या संपर्कात होतो. केंद्र सरकारच्या वतीने गृहमंत्रालयाच्या माध्यमातून देखील सर्व प्रकारची मदत करण्यात येणार आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व साधने वापरली जाणार आहे. त्यांचे नुकसान झाले त्यांना निश्‍चित मदत केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: we will try to provide all kind of help to flood victims says CM Devendra Fadnavis