अबब... चोरट्यांकडे सापडले सात पिस्तूल, 118 काडतूस 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 December 2019

यवतमाळ शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. रोज एक ना एक चोरी, लुटपात झाल्याची बातमी कानावर पडते. शुक्रवारी पोलिसांनी चोरड्यांकडे धाड टाकून मोठा शस्त्रसाठा जप्त केला. नांदेड येथून हे शस्त्र आणून त्याची विक्री करण्याचा गोरखधंदा चोरट्यांनी सुरू केल्याची माहिती आहे. 

यवतमाळ : शहरासह जिल्ह्यात घरफोडी, दुचाकी व मंगळसूत्र चोरीचे सत्र वाढले आहे. परराज्यातील चोरट्यांसह स्थानिक चोरटे मुद्देमाल लंपास करीत आहेत. चोरट्यांचा हा कारनामा सुरू असतानाच सात पिस्तूल, 118 जिवंत काडतूस, 17 चाकू, सात तलवारी असा मोठा शस्त्रसाठाच शुक्रवारी (ता. 13) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पोलिसांच्या हाती लागल्याने खळबळ उडाली आहे. 

पुसद शहरातील अनुप्रभा हॉटेल समोरून अमजद खान सरदार खान (वय 28, रा. पुसद), देव ब्रम्हदेव राणा (वय 22, डुबोली राणा, जि. रोहतक, हरियाणा), मोहम्मद सोनू मोहम्मद कलाम (वय 19, रा. कलासन, बिहार) यांना ताब्यात घेतले आहे. अमझद खान याच्या घरी झडती घेतली असता सहा पिस्तूल व 115 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

Image may contain: one or more people, people standing, baseball and outdoor
जप्त केलेल्या शस्त्रांसह कारवाई करणारे पोलिस 

दिग्रस शहरात सापळा रचून मोहमद आसीफ मोहमद अफजल (वय 27, रा. दिग्रस), सागर रमेश हसनापुरे (वय 22, रा. मंगरूळ दस्तगीर) यांच्याकडून देशी कट्टा, तीन काडतूस, 17 धारदार चाकू, सात तलवारी जप्त करण्यात आल्या. तसेच चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. त्यांनी आठ घरफोडी व सहा चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.

 

हेही वाचा - 'पत्नी और वो'चा फेरा अन्‌ त्याने कवटाळले मृत्यूला

 

कुख्यात सहा संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 14 लाख 34 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नांदेड येथून शस्त्र आणून त्याची विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू होता. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक नुरूल हसन, सहायक पोलिस अधीक्षक अनुराग जैन, पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक नीलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार यांच्यासह पथकाने केली. 

 

काय - मालकी हक्‍कासाठी शेतकऱ्याने घेतले विष

 

22 दुचाकी जप्त

संशयीतांकडे केलेल्या चौकशीदरम्यान कुख्यात दुचाकी चोर लखन राठोड (रा. मोरगव्हाण, ता. दारव्हा) हा देखील पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून 22 दुचाकी जप्त करण्यात आल्या. 12 दुचाकी यवतमाळ जिल्हा, दोन वाशीम, दोन बुलढाणा येथील गुन्हातील आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weapons seized in Yavatmal