रस्त्यावरच लावले शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

नागपूर : संपूर्ण कर्जमुक्ती व दुष्काळग्रस्तांना हेक्‍टरी पन्नास हजारांची मदत यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने "कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात' असे आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी वरात मध्येच अडविल्यामुळे रस्त्यावरच कर्जदार शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे प्रतीकात्मक लग्न लावण्यात आले.

नागपूर : संपूर्ण कर्जमुक्ती व दुष्काळग्रस्तांना हेक्‍टरी पन्नास हजारांची मदत यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने "कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात' असे आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी वरात मध्येच अडविल्यामुळे रस्त्यावरच कर्जदार शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे प्रतीकात्मक लग्न लावण्यात आले.
दुष्काळग्रस्तांना हेक्‍टरी 50 हजार रुपये मदत, नाफेडमध्ये विकलेल्या तूर, हरभरा, उडदाचे व्याजासकट पैसे द्या, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून दीडपट हमीभावाचा कायदा करावा, दुष्काळी परिस्थितीत बॅंका व मायक्रो फायनान्सची वसुली थांबवा, जनावरांना चारा द्या, वीज बिल वसुली थांबवा आदी मागण्यांसाठी यशवंत स्टेडियम येथून मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थानापर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रविकांत तुपकरी यांच्या नेतृत्वात "वरात' मोर्चा काढण्यात आला. सरसकट कर्जमाफी व सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या.
मोर्चा यशवंत स्टेडियम येथून निघून पंचशील टॉकिज, झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, संविधान चौक मार्गे मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थान रामगिरी येथे जाणार होता. मात्र, मोर्चास विधानभवन चौकाच्या समोर वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळच अडविले. त्यामुळे मोर्चेकरी संपप्त झाले. मोर्चकरी व पोलिस अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली. "सरकार हमसे डरती हैं, पुलिस को आगे करती हैं', "फडणवीस सरकार होश में आओ', "फडणवीस सरकार मुर्दाबाद', अशा घोषणाही देण्यात आल्या. पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांचे ओएसडी येणार असल्याचे सांगण्यात आले. आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आग्रही होते. त्यामुळे त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. तसेच मुला-मुलींचे कर्जाचा बोजा असलेला सातबारा हातात घेऊन लग्न लावण्या आले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलकांची घटनास्थळी भेट घेत मागण्यांचे निवेदन स्वीकारले. मुख्यमंत्र्यांशी नागपुरातच बैठक घेण्याची त्यांची मागणी पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले. आंदोलनात देवेंद्र भुयार, माजी खासदार सुबोध माहिते, प्रकाश पोपळे, दामोदर इंगोले, विशाल गोटे, संजय सत्यकार, ओम पाटील, गजानन देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने वाशीम, नागपूर येथील शेतकरी सहभागी झाले होते.
 
सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आंदोलकांची येथे येऊन भेट घेतली. मागण्यांबाबत आंदोलकांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घालून देण्यात येईल.
- चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री, नागपूर.

 
कर्जबारी असताना मुला-मुलींच्या लग्नामुळे शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर आणखी कर्जाचा बोजा येतो. आयुष्यभर ते कर्जबाजारी असतात. हेच मुख्यमंत्र्यांना आंदोलनाच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न होता. कर्जाचा उतारा असलेला सातबारा घेऊन प्रतीकात्मक लग्न लावले. पालकमंत्र्यांना मान देऊन आठ दिवसांसाठी आंदोलन स्थगित केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल.
- रविकांत तुपकर, प्रदेश अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

Web Title: wedding on the streets news